मुंबई :  देशात आता म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचं दिसून येतंय. एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे ब्लॅक फंगसची वाढती रुग्णसंख्या यामुळे देशासमोर दुहेरी चिंता उभी राहिली आहे. म्युकोरमायकोसिस हा आजार हवेतून होतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत एबीपी माझानं वैद्यकीय तज्ञांशी संवाद साधला. डॉ. तात्याराव लहाने यांनी यासंदर्भात सांगितलं की, म्युकरमायकोसिस आजार हा म्युकरमुळे होतो. म्युकर हा जमिनीत असतो आणि तो हवेत येऊ शकतो.  मात्र आपल्या शरीरात हा हवेतून जातो असं म्हणता येणार नाही, असं लहाने यांनी सांगितलं.


डॉ. लहाने म्हणाले की, म्युकर हवेतून शरीरात जातो असं काही घाबरण्याची गरज नाही. हवेतून शरीरात जाण्यासाठी त्याला मार्ग लागतो.  हा एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होत नाही. हा आजार संसर्गजन्य नाही, असंही ते म्हणाले. 


ते म्हणाले की, राज्यात आता 800 जवळपास या आजाराच्या केसेस आहेत. आपल्याकडे राज्यात 110 दवाखाने आहेत, जिथे यावर उपचार केला जातोय. यावर उपचारासाठी इंजेक्शनचं उत्पादन कमी होते कारण तेवढी आधी गरज नव्हती. मॅन्युफेक्चरिंग कमी रुग्ण संख्या वाढली त्यामुळे अडचण जाणवत आहे, असंही त्यांनी सांगितलं.


डॉ. लहाने यांनी सांगितलं की, पहिल्या लाटेमध्ये स्टिरॉइड दिले तरी हे रुग्ण आढळले नाहीत आता सुद्धा तेच उपचार देतोय, स्टिरॉइड देतोय. कोव्हिड वायरस म्युटेशन जे झालं आहे त्यामुळे हा आजार समोर येतोय.  सगळ्या मेडिकल कॉलेज मध्ये म्युकरसाठी पोस्ट कोव्हिड ओपीडी सुरू केली आहे.  महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये म्युकरमायकोसिस समावेश केला आहे. त्यामुळे दीड लाख खर्च शासनामार्फत उचलला जाईल. पण ज्यांना 5, 7 लाख लागत असतील महाराष्ट्र शासनाकडून शासकीय मदत म्हणून दिली जाणार आहे


खाजगी रुग्णालयाला सुद्धा आता जीआरमध्ये सांगितले प्रमाणे या योजनेत रजिस्टर करून घ्यायचे आहे. जेव्हा हे रजिस्टर करतील तेव्हा कलेक्टर मार्फत पुरवण्यात येणारे इंजेक्शन सुद्धा या खाजगी रुग्णालायला मिळतील, असं लहाने यांनी सांगितलं.


इंडस्ट्रीयल ऑक्सिजन हे एक कारण आहे ?
इंडस्ट्रीयल ऑक्सिजनमध्ये फंगस असेल तर सगळ्या ऑक्सिजनमध्ये फंगस असायला पाहिजे. त्यामुळे इंडस्ट्रीयल ऑक्सिजन हे याच कारण नाहीये, असं देखील लहाने यांनी स्पष्ट केलं.