लातूर : लातूर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपच्या उपमहापौरांनीच मनपाला कुलूप लावल्याचा प्रकार समोर आला आहे.  कामे वेळेवर होत नाहीत, अधिकारी जागेवर नसतात, यामुळे संतप्त उपमहापौरांनी टाळे लावले.

लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली आहे. मागील अनेक दिवसापासून या महापालिकेचा कारभार सुरळीत होण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रयत्न  करत आहेत. मात्र अनागोंदी कारभाराची सवय लागलेले प्रशासकीय अधिकारी मात्र बदलण्याचे नाव घेत नाहीत.

भाजपाचे उपमहापौर देविदास काळे यांच्या कार्यालयात रोज अधिकाऱ्याच्या तक्रारी करणारे यांची गर्दी वाढत आहे. यामुळे संतप्त झालेले उपमहापौर देविदास काळे आज नगररचना कार्यालयात गेले. काळे तिथे पोहोचले असता एकही अधिकारी हजर नव्हते.

यामुळे संतापलेल्या काळे यांनी या कार्यालयास कुलूप लावले. यावेळी या कार्यालयातील काही कर्मचारीही आतच कोंडण्यात आले. सत्ताधारी लोकप्रतिनिधीनेच असा प्रकार केल्याने लातुरात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जनतेची कामे तर वेळेत करावी एवढीच अपेक्षा असल्याची खंत यावेळी काळे यांनी बोलून दाखवली आहे.

नगररचना विभागात लोकांची अनेक महत्वाची कामं असतात. या महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळातील सुस्तीमधून बाहेर यायला तयार नाही, असे देविदास काळे यांनी सांगितले आहे.

नागरिक आपल्या कामांसाठी सहा-सहा महिने चकरा मारतात. लोकांची मानसिक छळवणूक केली जात आहे. लोकं  कामासाठी आल्यानंतर अधिकारी जाग्यावर नसतात. यामुळेच मी कुलूप लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे काळे यांनी सांगितले.