सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदावर पुन्हा एकदा भाजपने आपले वर्चस्व कायम राखलं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी भाजपचे आनंदा देवमाने हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने आघाडीच्या उमेदवारांचा 43-35 मताच्या फरकाने पराभव करत आपला गड कायम राखला.


महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी पार पडलेल्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांनी काम पाहिलं. यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार गीता सुतार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपाच्या गीता सुतार यांना 43 तर आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मते पडली.


तर उपमहापौर पदाच्या निवडीत सुद्धा भाजपचे आनंदा देवमाने आणि आघाडीचे योगेंद्र थोरात यांच्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आनंदा देवमाने यांना 43 तर आघाडीचे उमेदवार योगेंद्र थोरात यांना 35 मते मिळाली. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीत भाजपने बाजी मारली असून महापौरपदी गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काही नगरसेवक फुटतील अशी चर्चा होती. मात्र भाजपाने नगरसेवक एकसंग राहिल्याने ही निवडणूक भाजपाने आपल्या संख्या बळावर जिंकली आहे. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.