Bharat jodo yatra : भारत जोडो यात्रादरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनाकडून निदर्शने, आंदोलन केले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ठाण्यासह कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीड आदी शहरांमधून राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारा आंदोलन करण्यात आलं. त्यामुळं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापल्याचं चित्र निर्माण झालं होतं.


राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार, अटकेची मागणी -
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत सावरकरांविरोधात केलेली वादग्रस्त वक्तव्यं आणि त्यांच्या अपमानाप्रकरणी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी हिंगोलीत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांवरविषयी वादग्रस्त विधानं केली होती. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, ते इंग्रजांसाठी काँग्रेसविरोधात काम करायचे, त्यांनी दुसऱ्या नावानं स्वत:वरच पुस्तक लिहिलं आणि अंदमानातून सुटका होण्यासाठी त्यांनी इंग्रजांची माफी मागितली असे वादग्रस्त आरोप राहुल यांनी केले. त्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतरही राहुल गांधी यांनी अकोल्यात पुन्हा सावरकरांविषयी वादग्रस्त विधानं केली आहेत. सावरकरांचं कथित पत्र दाखवून त्यांनी त्यांच्यावर इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप केला. 


कल्याणमध्ये राहुल गांधींच्या फोटोची गाढवावरुन मिरवणूक
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या विरोधात अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ राज्यभरात जोडे मार आंदोलन केले जातेय..आज कल्याण पूर्व भागात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोडे मार आंदोलन करण्यात आले.यावेळी राहूल गांधी यांच्या फोटोची  गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. 
 
उल्हासनगरात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आज उल्हासनगरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने त्यांचा निषेध केला. स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणून घेणाऱ्या सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली, तसंच अंदमानच्या तुरुंगातली शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकदा माफीची पत्रं इंग्रज सरकारला लिहिली, अशी टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली होती. सावरकर हे इंग्रजांकडून निवृत्ती वेतन घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आज उल्हासनगरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर, अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी आधी इतिहास वाचावा, आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करावी, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.


उस्मानाबादमध्ये आंदोलन-
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी  सावरकरांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा आणि शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील सावरकर चौकात राहुल गांधी यांच्या विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन  केले आहे.


बीडमध्ये राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन - 
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून बीडच्या धारूर आणि अंबाजोगाई मध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं.. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. आणि याच वक्तव्याचा निषेध म्हणून बीडमध्ये देखील ठिक ठिकाणी राहुल गांधी यांच्या फोटोला जेवढे जोडे मरो आंदोलन करण्यात आलं. 


खेड येथे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन 
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिंदे गटातील शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका येथे शिंदे गटातील शिवसैनिकांनी हे आंदोलन छेडून आपला निषेध व्यक्त केला.


हिंगोलीत राहुल गांधी यांच्या फोटोला काळे फासले -
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचं पडसाद हिंगोलीमध्ये पाहायला मिळाले. हिंगोली शहरातील गांधी चौकात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.


उद्धव ठाकरेंची भूमिका काय?
मी पुन्हा पुन्हा सांगतोय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतीव आदर आहे. त्यांच्याविषयी राहुल गांधी बोलले, त्याच्याशी मी सहमत नाही या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीनं बुधवारी वारसा विचारांचा-हिंदुत्व या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करतात आणि त्याच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होतात, या मुद्यावर शेवाळे यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तसंच उद्धव ठाकरेंचा नामोल्लेखही न करता सर्वच वक्त्यांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. त्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना चिमटे काढले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलूच नये असं सांगून सावरकरांविषयी आपल्या मनात आदर असल्याचा उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.


नागपुरातही आंदोलन -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत राहुल गांधी यांचा निषेध केला. नागपूरच्या महाल परिसरातील टिळक पुतळावर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्य संदर्भात माफी मागावी अशी अपेक्षा आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. 


शेगावातल्या सभेत काळे झेंडे दाखवण्याचा राज ठाकरेंचा आदेश
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या वादात राज ठाकरे यांच्या मनसेनंही उडी घेतली आहे. राहुल गांधीच्या यांच्या शेगावातल्या सभेदरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.  राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं शुक्रवारी शेगावात त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्या सावरकरविरोधी वक्तव्यांमुळं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि शिवसेनेतल्या शिंदे गटानं त्यांच्याविरोधात निषेध आंदोलनांचं सत्र सुरु केलं आहे. शेगावच्या सभेनिमित्तानं त्या निषेध आंदोलनात मनसेही सामील होणार आहे. राहुल गांधी यांना शेगावातल्या सभेत काळे झेंडे दाखवण्याचा आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर युवक काँग्रेसचे त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतील असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत यांनी दिला आहे. युवक काँग्रेसचं वीसेक हजार कार्यकर्ते शेगावात येणार असल्याचा दावा कृणाल राऊत यांनी केला आहे.