मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना तोल घसरलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्य महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरून बोलताना सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सर्वच स्तरातून सुरु झाली होती. 

Continues below advertisement


ते आपल्या पत्रात म्हणतात...  


आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap,सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.


माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.


काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?


ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून मंत्रालयाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मात्र, त्यांनी यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेने वादाला तोंड फुटले.  चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा. चंद्रकांत पाटलांच्या या विधानाने राष्ट्रवादीसह महिला वर्गात संताप व्यक्त करण्यात येत होता. 


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या ? 


खासदार सु्प्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, दिल्लीमध्ये कोणत्या बैठकीनंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबत निकाल लागला अशी विचारणा करत दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारणार असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली होती. 




हे ही वाचलं का ?