नवी दिल्ली : केंद्र सरकारने एअर इंडियातील 100 टक्के समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. एअर इंडियाचे समभाग विकण्याचा मोदी सरकारचा प्रस्ताव देशविरोधी असल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच याविरोधात आपल्याला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.


सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "एअर इंडियाचा व्यवहार संपूर्णपणे देशविरोधी असून आता मला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय दिसत नाही. आपण आपल्या कुटुंबातील मौल्यवान वस्तू विकू शकत नाही."


एअर इंडिया विकण्यासाठी प्रयत्न सुरू; सरकारने निविदा मागविल्या




सरकारने एअर इंडियातील 100 टक्के समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. बिड डॉक्युमेंटनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन कंपन्यांमधील 50 टक्के भागही सरकारनं विक्रीस काढले आहेत. एअर इंडियाचं जॉइंट वेंचर असलेल्या AISATS मध्ये त्यांची 50 टक्के भागीदारी आहे.


100 टक्के शेअर विकणार सरकार


बोली प्रक्रियेमध्ये, जे पात्र ठरतील त्यांना 31 मार्चपर्यंत याची माहिती देण्यात येईल. दरम्यान, एअर इंडिया आणि इंडिया एक्सप्रेसचे 100 टक्के शेअर्स सरकराकडेच आहेत. याआधी 2018मध्ये एअर इंडियामध्ये 76 टक्के भागीदाी विकण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने मांडला होता. परंतु, त्यावेळी एकही खरेदीदार मिळाला नाही. अशातच सरकारने 100 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला.


गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत एका मंत्रिमंडळाने 7 जानेवारी रोजी एअर इंडियाच्या खाजगीकरणाशी निगडीत प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती. एअर इंडियावर 80 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, एअर इंडियाला 1932मध्ये जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइन्स या नावाने लॉन्च केलं होतं. 1946मध्ये याचं नाव बदलण्यात आलं होतं आणि 1953मध्ये सरकारने याचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले.