‘राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नसतं. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे की ते जवळच्याच व्यक्तीच्याच वैयक्तिक जीवनात जातात. तसं त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. एवढीच माझी त्यांना सूचना आहे.’ असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.
‘मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये’
नाना पटोले यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत जशीच्या तशी
प्रश्न : नाना काय नेमकं झालं की तुम्ही राजीनामा दिला?
नाना पटोले : मी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. जेव्हा सरकार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते तेव्हा अशी खुर्ची भोगायला मी आलेलो नाही. सरकार ऐकायला तयार नसेल, मनमानी सुरु असेल तर आपला राजीनामा देऊन जनतेची लढाई जनतेमध्ये जाऊन लढण्याची भूमिका मी घेतली. म्हणून मी आज राजीनामा दिला.
प्रश्न : राजीनामा तुम्ही थेट सुमित्रा महाजन यांच्याकडे दिला का?
नाना पटोले : नाही... कायद्यात अशी तरतूद आहे की, लोकसभा अध्यक्ष नसतील तर सेक्रेटरी जनरलकडे राजीनामा देता येतो. ते राजीनामा नतंर अध्यक्षांकडे सोपवतात.
प्रश्न : तुम्ही या राजीनाम्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
नाना पटोले : मी कारणं त्यात दिलेली नाहीत. एका ओळीचा राजीनामा आहे.
प्रश्न : राजीनामा देण्याचा नेमका निर्णय कधी झाला?
नाना पटोले : लोकशाही व्यवस्थेत जेव्हा अडचणी निर्माण होतात आणि जनतेत काम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा या गोष्टी मान्य नसतात त्यावेळी असे निर्णय घ्यावे लागतात.
प्रश्न : प्रफुल पटेल यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा पराभव करुन तुम्ही संसदेत प्रवेश केला. राजीनामा ज्यावेळी घेऊन जात होतात तेव्हा तुमच्या मनात नेमकी काय भावना होती?
नाना पटोले : मी ज्या उद्देशानं लोकसभेत आलो होतो त्या उद्देशाची पूर्तता करु शकलो नाही. अशावेळी सरकारमध्ये राहून त्यांच्या चुकीच्या निर्णयाचं समर्थन करण्यात मला स्वारस्य वाटत नाही. मतदारसंघातील जनतेनं मला मोठ्या अपेक्षेनं पाठवलं होतं. पण या सरकारनं जनतेचा विश्वासघात केला म्हणून अशा खुर्चीवर राहण्यात मला अजिबात स्वारस्य वाटत नाही.
प्रश्न : मोदींची सत्ता आल्यापासून कुणीही नेता मोदींविरोधात बोलण्याची हिंमत करत नव्हता. तुम्ही ती हिंमत केली.
नाना पटोले : असं आहे की, मी जनतेच्या आशीर्वादानं इथं आलो होतो. कुणाही नेत्याच्या उपकारनं इथं आलेलो नाही. अशा परिस्थितीत सरकारला वर्ष-दोन वर्ष वेळ देण्याची गरज असते. आपण ती वेळ दिली. पण सरकारनं जनतेला जी आश्वासनं दिली होती, जे जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. त्यापैकी काहीही पूर्ण केलं नाही. पंतप्रधानांनी प्रचारावेळी सांगितलं होतं की, आम्ही सत्तेत आल्यावर स्वामीनाथन आयोग मान्य करु पण सत्ता आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं अॅफिडेबिट करुन दिलं. तिथंच मोदींच्या सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. तेव्हाच माझ्या जिव्हारी लागलं. त्यानंतर बहुजनाच्या विशेषकरुन ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत असेल त्यांच्या मंत्रालयाबाबत असेल, मुलांच्या स्कॉलरशीपबाबत, बॅकलॉगबाबत असेल या सर्व गोष्टींमध्ये मला सरकारकडून विरोध होऊ लागला.
प्रश्न : पंतप्रधानांच्या सोबत झालेल्या खासदारांच्या बैठकीत मोदींनी तुम्हाला बोलू दिलं नव्हतं. ती जखम अजूनही तुमच्या मनात आहे?
नाना पटोले : मी काहीही माझ्यासाठी मागितलं नव्हतं, तर देशातील जनतेसाठी मागितलं होतं. सरकारनं जनतेला आधी आश्वासन दिलं होतं. पण खुर्चीवर आल्यानंतर आश्वासनं विसरायची असतील तर अशा व्यवस्थेत राहणं हे माझ्यासारख्या जमिनीशी नाळ जोडलेल्या माणसाला परवडण्यासारखं नाही.
प्रश्न : आजच्या या निर्णयाविषयी तुम्ही राज्यातील कोणत्या नेतृत्त्वाला कल्पना दिली होती का?
नाना पटोले : नाही... नाही... कशाला... नेतृत्त्वाला मी इतक्या वर्षभरापासून सांगतो आहे. त्यांना कळत नाही, मी काय सांगावं त्यांना की, मी राजीनामा देत आहे. मला तसं काम करायचं नव्हतं. मला जनतेची कामं करायची आहेत. पण सरकार त्याकडे वळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बऱ्याच वाढल्या आहेत. 43 टक्के आत्महत्या या हे सरकार आल्यापासून वाढल्या आहेत. शेतकरी जर रोज आत्महत्या करत असेल तर मी खुर्ची भोगायला आलेलो नाही.
प्रश्न : तुम्ही राज्याच्या विविध भागात फिरत आहात. तुमची पुढची राजकीय वाटचाल काय असणार?
नाना पटोले : मी अजून कोणताही राजकीय निर्णय केलेला नाही. पण निश्चितपणे हे थोतांड मांडणारं सरकार आहे. हे राज्यात आणि देशात येऊ नये याची मी काळजी घेईन.
प्रश्न : तुम्हाला असं वाटतं का भाजपला वेगळा पर्याय देण्याची गरज आहे?
नाना पटोले : आता जनताच पर्याय निवडेन.
प्रश्न : राजीनामा देण्यासाठी जेव्हा तुम्ही निघाला होतात. त्यावेळी तुम्ही घरच्यांशी काही चर्चा केली होती का?
नाना पटोले : नाही. मी घरच्यांशी राजकीय चर्चा करत नाही. त्यामुळे आता मी घरी जाऊन त्यांना समजवेन मला माहिती आहे की, माझे कुटुंबीय माझ्यासोबत कायम राहतील.
प्रश्न : संसदेतून बाहेर पडताना काय भावना होती?
नाना पटोले : संसद हे लोकशाहीचं प्रतिबिंब आहे. लोकांची इच्छा असेल तर पुन्हा संसदेत पाठवतील.
प्रश्न : गोंदियाच्या जनतेला आता तुम्ही कसं विश्वासात घेणार?
नाना पटोले : जनता माझ्यासोबतच आहे. मी हा जो निर्णय घेतला आहे तो जनतेमुळेच. मला मघापासून शुभेच्छांचे फोन येत आहेत. त्यामुळे जनता माझ्यासोबत आहे आणि ते माझ्या पाठीशी असल्यानं मी हा निर्णय घेतला आहे.
प्रश्न : तुम्ही एका अर्थानं आता मुक्त झाले आहात. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही संदेश द्याल?
नाना पटोले : काही नाही... त्यांनी जे काही आम्हाला सहकार्य केलेलं असेल इतके दिवस... मनापासून केलं असेल की कसं ते मला माहित नाही. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नसतं. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे की, जवळच्याच व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात ते जातात. तसं माझ्या वाटेला त्यांनी जाऊ नये एवढीच माझी त्यांना सूचना आहे.
प्रश्न : शेतकऱ्यांच प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही राज्यातच थांबणार की, दिल्लीत येणार?
नाना पटोले : असं आहे की, जे जनतेच्या मनात असेल तसंच घडेल.
VIDEO :
संबंधित बातम्या :
भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा
..तेव्हाच अशोक चव्हाणांनी पटोलेंना ऑफर दिली होती!