नाना पटोले दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सोपवला.
https://twitter.com/NANA_PATOLE/status/939039327736098816
नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती.
शेतकरी प्रश्नावरुन त्यांनी अनेकवेळा सरकारविरोधी भूमिका घेतली होती. नुकतंच भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनासाठी नाना पटोलेच यांनी सिन्हांना हाक दिली होती.
राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
नाना पटोले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज न ेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.
कोण आहेत नाना पटोले?
- 54 वर्षीय नाना पटोलेंचा जन्म भंडाऱ्यातील शेतकरी कुटुंबात झाला
- शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठं काम, मतदारसंघात नानाभाऊ म्हणून परिचित
- 1990 साली भंडाऱ्यातील सांगडीतून जिल्हा परिषदेवर निवडून गेले
- 1999 पासून सलग तीन वेळा साकोली मतदारसंघातून विधानसभेवर गेले
- काँग्रेसचे उपनेते म्हणूनही काम, 2014 आधी पक्षाच्या धोरणावर नाराज होऊन बाहेर
- भंडारा-गोंदिया मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली
- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलांचा 1 लाख 49 हजार मतांनी पराभव केला
नाना पटोलेंनी आधीच संकेत दिले होते
नाना पटोले यांनी अकोल्यात 25 सप्टेंबरलाच राजीनाम्याचे संकेत दिले होते.
राज्य सरकारनं सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले होते. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.
‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत नाना पटोले यांनी वेळोवेळी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.
काँग्रेसमध्ये या, अशोक चव्हाणांची नाना पटोलेंना जाहीर ऑफर
दरम्यान, नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. भाजपमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये यावं, असं चव्हाण म्हणाले होते.
संबंधित बातम्या
काँग्रेसमध्ये या, अशोक चव्हाणांची नाना पटोलेंना जाहीर ऑफर
फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले