ठाणे: भाजप नेते आमदार गणेश नाईक यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. बलात्कार प्रकरणी त्यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. गणेश नाईक यांच्या अंतरिम जामीनावर येत्या 27 तारखेला सुनावणी होणार आहे. 


भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात दोन गुन्हे दाखल आहेत. दीपा चौहान या महिलेला रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आणि बलात्कार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. या आधी गुरुवारी रिव्हॉल्वर दाखवून धमकी दिल्याच्या प्रकरणात त्यांना जामीन नाकारला होता. आज बलात्कार प्रकरणी जामीन नाकारल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. 


काय आहे प्रकरण?
भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपा चौहान यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्यासोबत गेल्या 27 वर्षापासून आपण लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत असून त्यांच्यासोबतच्या संबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला आहे. गणेश नाईक यांनी आपल्या मुलाला वडिलांचे नाव द्यावे.


गणेश नाईक यांनी यासाठी नकार दिल्याने दीपा चौहान यांनी थेट पोलीस ठाणे गाठत त्यांच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी दीपा चौहान यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली असून वेळ पडल्यास कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आपली गणेश नाईक यांच्या बरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाबरोबर सुरू असलेले बोलणे गणेश नाईक यांनी बंद केल्याचेही दीपा चौहान यांनी सांगितलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: