BJP MLA Ganesh Naik : भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अशातच गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गणेश नाईकांच्या अटकपूर्व जामिनावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश नाईकांना दिलासा मिळणार की, अटक होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय? 


सध्या गणेश नाईक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपा चौहान यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या बरोबर आपले गेल्या 27 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये आहे. या प्रेमसंबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला असून त्याला गणेश नाईक यांनी वडीलांचे नाव द्यावे, अशी मागणी दीपा चौहान यांनी केली आहे. गणेश नाईक यासाठी नकार देत असल्याने थेट पोलीस ठाणे गाठत दीपा चौहान यांनी गणेश नाईकांवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी दीपा चौहान यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली असून वेळ पडल्यास कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आपली गणेश नाईक यांच्या बरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाबरोबर सुरू असलेले बोलणे ही गणेश नाईक यांनी बंद केल्याचेही दीपा चौहान यांनी सांगितलं आहे.


पोलिसांनी गणेश नाईक यांना अटक करावी : रुपाली चाकणकर 


याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीनंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत की, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी या पीडित महिलेने प्रत्यक्ष भेट देऊन आपल्यासोबत घडलेली घटना महिला आयोगाला सांगितली. यामध्ये पीडितेने जी तक्रार राज्य महिला आयोगाकडे दिली, याची दखल घेऊन मुंबई पोलिसांना यासंबंधित तपास करून याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तपास करत असताना पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात 506 ब हा गुन्हा दखल केला. 16 तारखेला नेरुळ पोलीस ठाण्यात 376 हा गुन्हा दखल केला. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे 376 हा बलात्काराचा गुन्हा गणेश नाईक यांच्यावर दाखल झाला असताना, पोलिसांनी गणेश नाईक यांना अटक करावी, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच याचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.