मुंबई : राज्यात दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही, लोकप्रतिनिधींना त्या वास्तवाचा सोयीस्कर विसर पडत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क फिरणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर तर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. 

Continues below advertisement


मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्रालयातून बाहेर पडताना त्यांनी मास्क परिधान केलेला नसल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी 200 रुपयांचा दंड ठोठावला. त्या पार्श्वभूमीवर, आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे. महाविकास आघाडी महावसुली करत असल्याचा आरोप  मंगेश चव्हाण यांनी केला आबे. 


दरम्यान, महाराष्ट्रावर ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.


भारतातील नागरिक आता मास्कचा वापर करणे कमी करत आहेत. खासकरून ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी मास्कचा वापर करणे कमी केलं आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. जगभरातली परिस्थिती पाहून तरी भारतीय लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं निती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले. काही दिवसापूर्वी LocalCircle या एनजीओने भारतात एक सर्व्हेक्षण केलं होतं. त्यामध्ये भारतातील तीन पैकी एकच नागरिक मास्कचा वापर करत आहेत असं समोर आलं आहे. देशातील केवळ दोनच टक्के लोकांनी सांगितलं की त्यांच्या परिसरातील लोक हे मास्कचा वापर आणि इतर कोरोनाच्या नियमांचे पालन करत आहेत.



इतर महत्त्वाच्या बातम्या :