मुंबई : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना भाजप राज्यसभेत पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील भाजप नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी दिल्लीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडिक यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोन तासांच्या चर्चेनंतर उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहेत.
राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिल 2020 ला रिक्त होत आहेत, त्यासाठीची निवडणूक फेब्रुवारी अखेरपर्यंत जाहीर होऊ शकते. भाजपकडून या निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावं चर्चेत आहेत. रामदास आठवले यांचं नाव आधीच निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचं निश्चित झाल्याचं समोर येत आहे. उदयनराजे भोसले यांनी यंदाची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती आणि जिंकलेही होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच निवडणूक; कुणाची वर्णी लागणार, कुणाला डावललं जाणार?
येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेचे एकून सात सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही. त्यानंतर रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांचंही नाव जवळपास निश्चित झालं आहे. मात्र उरलेल्यांपैकी कोणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला नव्याने संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी किरीट सोमय्या, विजया रहाटकर, हंसराज अहिर यांचीही नावं चर्चेत आहेत.
महाविकासआघाडीचं संख्याबळ पाहिलं तर 7 पैकी 4 खासदार त्यांचे निवडून येऊ शकतात. त्यामुळे यात राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक अशी विभागणी होऊ शकते. शिवसेनेच्या मदतीची भरपाई पुढच्या वेळी त्यांना अधिक सीट देऊन केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार राज्यसभेवर जातात. दर दोन वर्षांनी 7, 6 आणि 6 अशा जागा रिक्त होतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा 7 जागांसाठी निवड झाली होती तेव्हा ती बिनविरोध झाली होती. आता यावेळीही निवडणूक बिनविरोध होणार की एखादा जास्तीचा उमेदवार रिंगणात येऊन प्रत्यक्ष निवडणूक पार पडणार हे येत्या काह दिवसात स्पष्ट होईल.