मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या मुद्यावरुन सुरू झालेलं राजकारण चांगलच तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकासंदर्भात राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांना भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलं. मात्र लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात राऊतांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे उदयनराजेंकडे पुरावे आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, आपण दाऊदलाही दम दिलाय असा दावाही संजय राऊतांनी या कार्यक्रमात केला आहे.
उदयनराजेंकडे छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांना, भाजपनं जेम्स लेन आणि मुघलांच्या अवलादाची उपमा दिली आहे. त्यामुळं उदयनराजेंकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांवर भाजपनं हल्लाबोल केला आहे. संगमनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन केलं. त्याचसोबत आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाही संजय राऊतांविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. शिवरायांच्या वंशजांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चाने संजय राऊतांनी उदयनराजेंची माफी मागण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे.
पाहा व्हिडीओ : महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, संजय राऊतांचे उदयनराजेंना आव्हान
संजय राऊतांवर थेट निशाणा साधत आशिष शेलार म्हणाले की, आमच्या बरोबर सत्ता भोगून नवीन निवडणुकांआधी दुसऱ्याबरोबर युती करण्याचा घाट घातला याला भारतीय संस्कृतीत, वैवाहिक जीवनामध्ये व्यभिचार असे म्हणतात. आमच्या बरोबर सत्ता भोगून नवीन निवडणुकांआधी दुसऱ्याबरोबर युती करण्याचा घाट घातला, याला भारतीय संस्कृतीत, वैवाहिक जीवनामध्ये व्यभिचार असे म्हणतात. शिवसेनेने केलेल्या राजकीय व्यभिचार आणि विश्वास घात आता समस्त महाराष्ट्राला सार्वजनिक उलटी करून संजय राऊत यांनी दाखवलेला आहे. व्यभिचाराला सन्मान समजणारे हे कु वृत्तीचे महाराष्ट्र द्रोही आहेत असं आम्ही समजतो.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'साताऱ्याच्या गादिचा सार्वजनिक अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे पुरावे मागायचे असे घृणास्पद प्रश्न केवळ आणि केवळ जेम्स लेनची अवलाद असणार्यांनाच पडतात.'
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तर राऊत यांना सज्जड दम दिला आहे. आम्ही राजघराण्यात जन्मलो याचे नेमके काय पुरावे द्यायचे? असा सवाल करत आम्ही राजघराण्यात जन्माला आलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे म्हटले आहे. हा वाद त्यांनी सुरू केला आहे. आता तो संपवायचा कसा हे त्यांनीच बघावं, असंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. तर संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. यावर बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की, सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करली की जनता यांच्यावर आता थुंकेल. यांच्या रक्तातच गद्दारी आहे. म्हणून लोकसभेच्या निकालानंतरच सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. शिवसेना एकटी लढली नसती तर 25 जागा पण निवडून आल्या नसत्या याची जाणीव त्यांना होती. म्हणून भाजपसोबत युतीत लढले. म्हणूनच 55 जागांची मजल मारू शकले, असेही ते म्हणाले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितल्याप्रकरणी त्यांनी संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? असा सवाल केला आहे.
पाहा व्हिडीओ : वंशजाचे पुरावे मागणारे जेम्स लेनची औलाद, संजय राऊतांच्या पुराव्यावरील वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, जाणता राजाची बिरुदावली छत्रपतींनाच दिली जाते. दुसऱ्यांवर आक्षेप घेतांना इतरांचे आक्षेपही कबूल केले पाहिजेत. ही दुट्टपी भूमिका आहे. इतर नेत्यांना महाराजांची उपाधी दिली तर त्याचीही चर्चा होणारच. शिव म्हणजे महाराजांशी संबंधित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नावाबाबत उदयनराजेंची भूमिका अगदी योग्य आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्या सर्वांना आम्ही जर यावर भूमिका घ्या असं बोललो तर त्यात चुकीचं काय? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला होता. ते एवढ्यावरचं थांबले नाहीत तर त्यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावा देखील मागितला.
संबंधित बातम्या :
मी दाऊद इब्राहिमला अनेकदा भेटलोय, त्याला दम भरलाय : संजय राऊत
'जाणता राजा' उपाधी देणारे रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते : शरद पवार