मुंबई : मागील फडणवीस सरकारच्या काळात शालेय शिक्षण विभागातील राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचा शासन निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून जारी करण्यात आला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतरही शिक्षण मंडळावरील आधीच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरही नवीन मंडळे, नवीन नियुक्त्या केल्या जातील, अशी शक्यता आहे. ठाकरे सरकार आल्यानंतर अनेक महामंडळं आणि काही विभागातील अशासकीय नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता शिक्षण विभागातील नियुक्त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.


 आगामी महिन्यांत दहावी , बारावीच्या शालांत परीक्षा तोंडावर असताना अभ्यास मंडळातील या बदलांचा विद्यार्थी आणि अभ्यासक्रमावर विपरित परिणाम होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व इतर विभागामध्ये सर्व संवर्गतील सदस्यांची 4 वर्षासाठी अशासकीय नियुक्ती मागील सरकारच्या काळात करण्यात आल्या होत्या. या सर्व नियुक्त्या आता रद्द करण्यात येणार आहेत.




मुंबई, पुणे ,कोल्हापूर , नाशिक, औरंगाबाद, लातूर , नागपूर, अमरावती आणि कोकण मंडळाच्या विभागीय शिक्षण मंडळांवरील मुख्याध्यापक, शिक्षक/ प्राचार्य (कनिष्ठ महाविद्यालय ), शिक्षक (माध्यमिक विभाग ), व्यवस्थापन समिती(माध्यमिक विभाग), व्यवस्थापन समिती (कनिष्ठ महाविद्यालय ) या संवर्गातील नियुक्त्या रद्द करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.


 सोबतच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावरील शिक्षण तज्ञ आणि शिक्षणशास्त्राच्या प्राचार्यांच्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र सत्तेत आलेल्या नवीन सरकारकडून रद्द करण्यात आलेल्या या नियुक्त्यानंतर नवीन नियुक्त्या कधीपर्यंत करणार याबाबत कोणतेही सूतोवाच करण्यात आले नाही.