पुणे : मी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अनेकवेळा भेटलो आहे. त्याला दम भरला आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज पुण्यात लोकमत वृत्तसमुहाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी दाऊद इब्राहिमसोबतच्या भेटीबाबत माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले की, तुमच्यात हिंमत असेल तर कोणीही तुमच्याकडे पाहू शकत नाही. मग तो कोणीही असो, पंतप्रधान असो अथवा गृहमंत्री असो. मी कोणालाच घाबरत नाही. मी दाऊद इब्राहिमला अनेकवेळा पाहिलं आहे. त्याच्याशी बोललो आहे. मी त्याला एकदा दमदेखील भरला. मी पूर्वी मारामाऱ्यादेखील करायचो, त्यावर बाळासाहेबांचं बारीक लक्ष होतं. तोच माझा यूएसपी होता.
राऊत म्हणाले की, लोक मला अजूनही गुंड म्हणतात. बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी ओळख करून द्यायचे. मी दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे मी फोटो काढले आहेत. त्याला दमदेखील दिला आहे. दाऊदपासून अनेक मोठ्या गुंडांचे मी फोटो काढले आणि त्या काळात सर्वांना दम दिला आहे. आज ते सर्व पळून गेले आहे. पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचं मोठं साम्राज्य होतं. परंतु आता ते खलनायक आता राहिले नाहीत.
राऊत म्हणाले की, खलनायक हा समाजाचा भाग आहे. आपल्या आसपास अनेक खलनायक फिरत असतात. आम्ही त्यांना बघतो. आमच्या पक्षात मात्र कुणीही खलनायक नाही, पण ज्यांना वाटतं की संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली नाही त्यांना वाटतं मी खलनायक आहे. राजकारणात असं हे चालत असतं. आपण ते विसरून जायचं असतं.
दरम्यान, संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेलादेकेळी जोरदार उत्तर दिले आहे. राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना आवाहन केलं आहे की, ते छत्रपती शिवाजी माहाराजांचे वंशज असल्याचे पुरावे दाखवावे.
उदयनराजें खासदार संजय राऊतांवर काय म्हणाले? | ABP Majha
छत्रपतींच्या वारसदारांनी भाजपतून राजीनामे द्यावेत : संजय राऊत | ABP Majha