मुंबई : परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात तीन ठिकाणी वॉरंट बजावण्यात आलं आहे. मात्र ते या तिनही ठिकाणी उपलब्ध नव्हते अशी माहिती पोलिसांनी  चांदिवाल आयोगापुढे सादर केली. त्यामुळे आता परमबीर नेमके आहेत कुठे?, असा सवाल विचारला जातोय. मात्र यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे.  परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यात भाजपनं मदत केली असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 


नाना पटोले म्हणाले, परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यात भाजपनं मदत केली आहे. परमबीर यांच्या बाबत गृहविभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं शेवटचं लोकेशन गुजरातच्या अहमदाबादमध्ये होतं. अहमदाबादमधूनच त्यांनी केंद्रातल्या भाजप नेत्यांना संपर्क साधला होता. आणि परमबीर सापडले तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  अटक होण्याच्या भीतीनं देश सोडून परदेशात गेले असावेत असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय. सूत्रांच्या माहितीनुसार  तपास यंत्रणांना संशय आहे की परमबीर युरोपातील देशात लपले असावेत. पण त्याबाबतचा पुरावा अजून यंत्रणांना मिळालेला नाही.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगारमोर सातत्यानं गैरहजर राहणार्‍या परमबीर सिंह यांच्याविरोधीत अखेर चांदिवाल आयोगानं वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले होते. वारंवार निर्देश देऊनही परमबीर सिंह आयोगापुढे हजर न रहील्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी मलबार हिलसह पंजाबमधील चंडगढच्या दोन पत्यांवर हे वॉरंट बजावलं, पण परमबीर हे कुठेही आढळून आले नाहीत. मात्र परमबीर हे एक जेष्ठ आयपीएस अधिकारी असल्यानं त्यांना अखेरची संधी देत आयोगानं 6 ऑक्टोबरच्या सुनावणीत मुंबईत आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.