मुंबई ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर (Bhau Torsekar)  आणि चेतन दीक्षित यांना भाजपच्या मीडिया प्रभारी श्वेता शालिनी (Shweta Shalini)  यांनी कायदेशीर नोटीस बजावली होती.  मात्र वरिष्ठांनी समज दिल्यानंतर अखेर श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांना बजावलेली कायदशीर नोटीस मागे घेतली. एकीकडे श्वेता शालिनी यांच्या याच ट्विटची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वर्धा आणि नांदेडमध्ये देखील भाजपमधील (BJP)  अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत.   त्यामुळे भाजपमध्ये नेमक चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केलेला व्हिडीओ भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला. तो भाजपच्या इतका जिव्हारी लागला की भाजपची मजल त्यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवण्यापर्यंत गेली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचा मीडिया सेल कसे कसे अपयशी ठरल याचे भाष्य करणारा हा व्हिडिओ होता.  मात्र भाजप मीडिया प्रभारी श्वेता शालिनी यांनी या व्हिडीओनंतर भाऊ तोरसेकर यांनाच कायदेशीर नोटीस पाठवली. श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांच्या सह चेतन दीक्षित यांनाही कायदेशीर नोटीस पाठवली .


श्वेता शालिनी यांनी खुद्द ट्विट करत भाऊंना कायदेशीर नोटीस पाठवण्याची माहिती दिली. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर श्वेता शालिनी यांच्यावर जोरदार टीका झाली. ही टीका झाल्यानंतर आणि या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर श्वेता शालिनी यांनी आपले ट्वीट डिलीट करत कायदेशीर नोटीस मागे घेतल्याचं दुसरं ट्विट केलं. 


श्वेता शालिनी ट्वीटमध्ये  काय म्हणाल्या? 


काही मोजक्या लोकांच्या ऐकण्यावरून कोणतीही शहानिशा न करता माझ्याविषयी व्हिडीओ बनवणे तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराकडून अपेक्षित नव्हते.  माझी बाजू समजून न घेता तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकाराने कोणाच्या सांगण्यावरून एकतर्फी व्हिडीओ बनवणे याची मला अपेक्षा नव्हती; याच दुःखातून मी आपणास एक लीगल नोटीस ही पाठवली. आपणाशी  माझा कोणताही व्यक्तीगत वाद नाही. त्यामुळे मी आपणस पाठवलेली लीगल नोटीस वापस घेत आहे.


 






भाजपमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर


 एकीकडे भाजपमध्ये श्वेता शालिनी यांच्या ट्विटवरून उलट सुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. नांदेडमध्ये मंथन बैठकीत भाजप पदाधिकारी आणि शहराध्यक्षांमध्ये चांगली बाचाबाची झाली. राधाकृष्ण विखे पाटील नांदेड येथील पराभवाची कारण जाणून घेण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून आले होते. मात्र बैठक सुरू होण्याअगोदर हा राडा सुरू झाला. तर वर्धा येथे देखील  भाजपची चिंतन बैठक  वादळी ठरली.. वर्ध्यात भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची लोकसभा निरीक्षकाकडून तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. वर्ध्यात भाजपच्या  झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी ही चिंतन बैठक होती.  पण पराभवाची कारणे शोधताना आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी प्रचार न करता घरी बसून राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या पराभवासाठी जबाबदार ठरविल्याने बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याची  माहिती पुढे आली आहे. बैठकीत एकमेकांवर जबाबदारी ढकलत आमदार आणि पदाधिकारी यांच्यात आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.


भाजपमध्ये आलबेल नसल्याचे चित्र 


एकूणच काय लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपमध्ये आलबेल नसल्याचेच चित्र स्पष्ट झालंय. त्यामुळे आता वरिष्ठ नेते भाजप या दोन्ही प्रकरणाची काय दखल घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


हे ही वाचा :


महायुती सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विसर? गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!