जालना : जमिनीच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या रावसाहेब भवर या भाजप नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी केलेल्या कारवाईत भवर यांना अटक करण्यात आली असून इतर दहा आरोपी आद्यपही फरार आहेत.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची काल जालना शहरात बैठक सुरू असतानाच जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात भाजपच्या किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने एका शेतकरी कुटुंबाला जोरदार मारहाण केल्याची घडली होती. या प्रकरणी परस्परांविरोधात तक्रार देण्यात आल्यानंतर रावसाहेब भवर यांच्यासह 11 जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जाफराबाद तालुक्यातल्या निवडुंगा गावात भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी एका शेतकरी कुटुंबातील पुरुष आणि महिलांना जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. शेतीच्या वादातून ही मारहाण केल्याचा आरोप शेतकरी विठ्ठल खांडेभराड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.



रावसाहेब भवर आणि खांडेभराड यांच्यात 28 एकर जमिनीचा वाद आहे. याच जमिनीवर विहीर खोदण्यासाठी रावसाहेब भवर हे गुंडासह शेतात जेसीबी घेऊन आले होते. त्यांना विरोध केला असता रावसाहेब भवर यांनी मारहाण केली, असा आरोप महिला शेतकऱ्यांनी केला आहे.