मुंबई : मुंबईमध्ये आज दोन हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. गोवंडीच्या शिवाजी नगर भागात सात वर्षीय मुलाची हत्या तर मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी केळकर कॉलेजच्या परिसरात मृतदेह अढळला आहे.


गोवंडीच्या शिवाजी नगर भागात भाऊ आणि वहिनी त्रास देतात या रागातून काकानेच सात वर्षाच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इरफान अब्बासी असे हत्या झालेल्या सात वर्षाच्या मुलाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी त्याचा काका नौशाद अल्लाउद्दीन अब्बासी याला बेड्या ठोकल्या आहेत.

नौशाद हा आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता. वहिनी आणि भाऊ त्याच्याशी सारखे भांडतात. या रागातून त्याने त्यांच्या सात वर्षाच्या मुलाचा रिक्षा पार्किंगमध्ये नेऊन गळा दाबून आणि फुटलेल्या बाटलीच्या काचेने वार करुन त्याची हत्या केली.

तर दुसरीकडे मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी केळकर कॉलेजच्या परिसरात गवतात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाच्या छातीवर आणि मानेवर वार असल्याने त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह आणून टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह, गुन्हे शाखेचे अधिकारी, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेहाच्या छातीवर आणि मानेवर धारधार शस्त्राचे वार असल्याने त्याची हत्या करून आणून टाकल्याची शक्यता आहे.