Kirit Somaiya :  भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज दापोली दौऱ्यावर आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री अनिल परब यांचे  रिसॉर्ट तोडण्यात यावे म्हणून सोमय्या आज दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकावर जोरदार टीका केली. याबोरबरच पुढील आठवड्यात आणखी तिघांवर कारवाई होणार असा इशारा, देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया यांना किरीट सोमय्या यांनी आव्हान दिले आहे. 


"केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र असतील तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? भाजप नेते याबद्दल आधीच कसं ट्वीट करतात? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी काल उपस्थित केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे काल लोकसभेत आक्रमक झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या या प्रश्नावरून किरीट सोमय्या यांनी आज त्यांना आव्हान दिले. " सुप्रिया सुळे यांना मी आजच सांगतो की, पुढील आठवड्यात आणखी तिघांवर कारवाई होणार आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 


"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही कारवाई होणार" 
दरम्यान, राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधातही कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा इशारा किरीट सोमय्यांनी यावेळी दिला आहे. सोमय्या म्हणाले, "ठाकरे सरकारने फक्त लुटण्याचं काम केलं आहे. ठाकरे सरकार हे फक्त माफिया सरकार आहे. नंदकिशोर चर्तुवेदी यांच्यासोबतचे उद्धव ठाकरे यांचे व्यवहार समोर आणणार असून त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडणारच आहे. मी तोडून दाखवतो, तुम्ही वाचवून दाखवा." 


"फक्त रिसॉर्ट तोडणार नाही , तर 25 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार समोर आणणार आहे, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले, असा धडा शाळेत असेल, अशी टिप्पणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे. 


दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या दौऱ्यावरून दापोलीतील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. सोमय्यांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कार्यकर्त्यांकडून सोमय्या यांचा निषेध करण्यात आला आहे. तर किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील आक्रमकपणा पाहता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. परंतु, यावरूनही सोमय्या यांनी राज्य सरकारव टीका केली. हिंमत असेल तर आमच्यासोबत लढा, पोलिसांना का मध्ये आणता? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.  



महत्वाच्या बातम्या


धाडी पडणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक