Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) फरार झाले आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)  यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. 


किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली होती. परंतु किरीट सोमय्या दिल्लीला गेल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली होती. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. "सोमय्या बाप बेटे फरार आहेत. हे दोघेही मिल्खा सिंगपेक्षाही जास्त वेगाने धावत आहेत. धाव सोमय्या धाव’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. 


सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि पुत्र नील सोमय्या यांनी गोळा करण्यात आलेल्या निधीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर पोलिसांकडून किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना समन्स बजावलं होतं. यावरूनच संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. "58 कोटींचा हिशोब द्यावाच लागेल. देश देव आणि धर्माशी बेइमानी करणाऱ्या बाप बेट्याला जेलमध्ये जावेच लागेल. भोगा आपल्या कर्माची फळे." असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. 
 
काय आहे प्रकरण?
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होते. मात्र सोमय्या पिता-पुत्र काल चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं होतं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, काल ते चौकशीला हजर राहू शकले नाहित. 


सोमय्या यांच्या वकिलांनी काल याबाबत माहिती देताना सांगितले होते की, 'आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्रं दिलं आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहतील.'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या