पुणे : येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याआधी एक जून रोजी एक्झिट पोलच्या माध्यमातून देशात कोणाची सत्ता येणार, याचा अंदाज वर्तविला जाईल. महाराष्ट्रात ही निवडणूक एकूण सहा टप्प्यांत पार पडली. या निवडणुकीत बारामती (Baramati) हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहिला. येथे नणंद-भावजय यांच्यात लढत झाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची ठरली. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले. यावरच आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलत होते.
हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
हर्षवर्धन पाटील इंदापूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. बारामती लोकसभेसह राज्यातील जास्तीत जास्त जागा महायुती जिंकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. घोडा मैदान लांब राहिलेले नाही. बारामतीसह महाराष्ट्रातील 48 जागांवरील निकाल महायुतीच्या बाजूने लागेल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
बारामतीत कोणामध्ये लढत झाली?
बारामती या जागेवर राष्ट्रवादी (शदर पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या तथा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार तर सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार होत्या. या दोन्ही आघाड्यांनी आपापल्या उमेदवाराचा विजय व्हावा म्हणून पूर्ण ताकद पणाला लावली. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनीदेखील आपले राजकीय कौशल्य वापरत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात मोठ्या सभा घेत निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले.
अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला
अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांना सोबत घेत आपली वेगळी चूल मांडली. सध्या राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले आहेत. अजित पवारांच्या या निर्णयानंतर देशात लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे अजित पवार यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची ताकद दाखवावी लागणार होती. त्यातही बारामती हा मतदारसंघ जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायची, असा निश्चय अजित पवार यांनी केला होता. प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे त्यांनी येथील जनतेला आकर्षित करण्यासाठी दिवसरात्र एक केला. याच कारणामुळे आता बारामती या जागेवर कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या जागेवरचा निकाल येत्या 4 जून रोजी स्पष्ट होईल.
हेही वाचा :
आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका, मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणारच; भुजबळांचे दरेकरांना उत्तर
Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज