Gopichand Padalkar On Sharad Pawar : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्याकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर कायमच टोकाची टीका केली जाते. आताही त्यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत कडत शब्दात टीका केली आहे. "बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय," अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
पुण्यातील कामशेतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात आमदार पडळकर बोलत होते. भाजप आणि आरपीआयने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केलं होतं. या पूर्वी देखील पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आताही शरद पवार यांच्यावर टीका करताना आमदार पडळकरांची जीभ घसरली आहे.
आमदार पडळकरांनी शरद पवारांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख मात्र त्यांच्याकडेच होता. आरपीआयसह राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या? असा प्रश्न पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला. याबरोबरच संघटना आणि चळवळी फोडण्याचं हे काम पन्नास वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं पडळकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, आमदार पडळकर यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील शरद पवार यांच्यावर एसटी बँक निवडणुकीवरुन गंभीर आरोप केला होता. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं आहे की, मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटींची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. एसटी बँकेची निवडणूक घोषीत केली आहे आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढला आहे. सहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही."
महत्वाच्या बातम्या