Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Aarti Singh) यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची संसदीय विशेषाधिकार समिती समोर आज सुनावणी पार पडणार आहे. आज होणाऱ्या सुनावणीसाठी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन उपायुक्त शशिकांत सातव उपस्थित राहणार आहेत. यासाठी खासदार नवनीत राणा अमरावतीत दाखल झाल्या आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष
नवनीत राणा यांनी केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीनंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग आणि आमरावतीचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना नोटीस पाठवून 6 एप्रिल म्हणजेच आज लोकसभा सचिवालयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय.
निलंबनाची कारवाई करायला लावणार- नवनीत राणा
14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित) यांचाही समावेश आहे आणि अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. आता 6 एप्रिल रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे ज्यामध्ये आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना देखील हजर राहावं लागत आहे.
संबंधित बातम्या