TET Exam Scam Case : टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. संगमनेरमधल्या मूळ गावातून त्यांना अटक करण्यात आली. तर याच प्रकरणात बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहचणार याबाबत उत्सुकता आहे. 


टीईटीच्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन सुरु होते, असं आता स्पष्ट झालं आहे. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आणखी दोन महत्वाच्या व्यक्तींना या प्रकरणात अटक केली आहे.  यातील पहिली अटक आहे, जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची.  अश्विन कुमारला पुणे पोलीसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे. तर दुसरी महत्त्वाची अटक आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची. डेरेंना संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून पोलिसांनी अटक केली आहे. अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याच समोर आलं आहे. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे 2017 ते 2020 या काळात शिक्षण परिषदेचं परीक्षा घेण्याचं कंत्राट होतं. मधल्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले आहेत. पण हे सुखदेव डेरे नेमके कोण? 


टीईटी पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे कोण? 



  • संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे जन्म व मुळगाव

  • माध्यमिक शिक्षण कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे झालं आहे

  • त्यानंतर उच्च माध्यमिक व बी. एड. चे शिक्षण संगमनेर शहरात

  • बी. एड. झाल्यावर संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली आहे

  • MPSC परीक्षा पास होऊन सरकारी सेवेत रुजू

  • नंदुरबार येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी, औरंगाबाद येथे शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक, एस. एस. सी.  बोर्डात अध्यक्ष म्हणून ही कामकाज केलं आहे 

  • आणि शेवटी परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कामकाज पाहून त्या ठिकाणाहून सेवा निवृत्त

  • गेल्यावर तीन वर्षांपासून संगमनेर शहरातील अकोले बायपास भागात वास्तव्य

  • पत्नी, मुलगा, सून आणि मतिमंद मुलगी असा परिवार


महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम तुपेंच्या घरी धाडसत्र 


TET परीक्षा  पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे.  शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.  दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी पैशाचं घबाड सापडलं आहे. पोलिसांना तपासात सुपेंच्या घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत केलं आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती.  मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले. याआधी 17 डिसेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली होती.   पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपेंसोबत शिक्षण आयुक्ताचा  सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. 


दरम्यान, टीईटी गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. शालेय शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे या प्रकरणाच्या चौकशीसाठी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांना 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, तुकाराम सुपेंना 17 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरातून आतापर्यंत 3 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI