कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी केलेल्या एका ट्विटवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना ट्वीट करून अभिवादन केलं होतं. त्यावेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना 'थोर सामाजिक कार्यकर्ते' असं संबोधलं होतं. यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख कार्यकर्ते असा केल्यामुळे फडणवीसांविरोधात संतापाची लाट उसळली होती. सदर प्रकरणी खासदार संभाजीराजे यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली होती. याच ट्वीटला रिप्लाय करत देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.



देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.'


दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात प्रवेश देण्यात येणार नाही, अशी भूमिका


कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली होती. त्यानंतर कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी निदर्शनंही करण्यात आली होती. तसेच सदर प्रकरणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी एक ट्वीट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या याच ट्वीटला रिप्लाय करत देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.



खासदार संभाजीराजे यांचं ट्वीट :


छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.'


सदर प्रकरणी खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती भूमिका :


खासदार संभाजीराजे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते की, ' छत्रपतीं विषयी जेंव्हा केंव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेंव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेंव्हा केली गेली तेंव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजा मधील माझ्या चालू भाषणात जेंव्हा मला हे कळलं तेंव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तेंव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?'



पुढे बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, 'शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या चरित्रातील आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच, दिल्लीमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली. राष्ट्रपती असतील किंवा परदेशी राजदूत असतील या सर्वांना महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला मी भाग पाडले. आज जगभर त्या शिवजयंतीची दखल घेतली जात आहे.'


संबंधित बातम्या : 


Coronavirus | मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क मंत्रालयात!


स्थलांतराचं विदारक चित्र अशोभनीय, लॉकडाऊनच्या उपाययोजनांबाबत मंत्री छगन भुजबळांची नाराजी


धक्कादायक... सायन रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, व्हिडीओ व्हायरल