मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाविरुद्ध फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढल्याचं चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील तब्बल 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 51 अधिकारी आणि 480 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर कर्तव्य बजावणाऱ्या पाच पोलिसांनी प्राण गमावले आहेत.
सद्यस्थितीत 43 अधिकारी आणि 444 कर्मचारी कोरोनासंक्रमित आहेत. तर आतापर्यंत 39 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आठ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मुंबईतील तीन तसंच पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मुंबई पोलीस दल - वाकोला पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर
मुंबई पोलीस दल - हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे
मुंबई पोलीस दल - कुर्ला वाहतूक विभाग, पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे
पुणे पोलीस दल - फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे
सोलापूर पोलीस दल - एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख
पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष
पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
लॉकडाऊनपासून 96 हजार 231 गुन्हे दाखल
राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात 96 हजार 231 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसंच पोलिसांवर हल्ला होण्याच्या 189 घटना घडल्या. 73 पोलीस आणि एक होमगार्डचा जवान यात जखमी झाले आहेत. या घटनांप्रकरणी 683 जणांना अटक केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान 30 आरोग्य कर्मचाऱ्यांवरही हल्ल्याची घटना घडली आहे.
साडेतीन कोटींचा दंड वसूल
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 5 मे या कालावधीत कलम 188 नुसार 96 हजार 231 गुन्ह्यांची नोंद झाली असून 18,885 जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण 53 हजार 330 वाहनं जप्त केली असून 3 कोटी 56 लाख 81 हजार 994 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.