मुंबई : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विजयाने महाराष्ट्रातील राजकीय गणितांना नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कारण कोविंद यांना 208 मतं पडल्याने फडणवीसांना कायम पाठिंबा काढण्याची भीती देणाऱ्या शिवसेनेची हवाच निघाली आहे.


शिवसेना-भाजपच्या मतांचं गणित

रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्रातून एकूण 208 मतं पडली. या 208 मतांमध्ये शिवसेनेची 63 मतं आहेत. समजा ही 63 मतं वजा केली, तर 145 उरतात. याचा अर्थ राज्यात भाजपच्या बाजूने 145 मतं आहेत.

याच आकडेवारीचा राज्यापुरता विचार केल्यास, 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमतासाठी 145 मतांची आवश्यकत असते. कोविंद यांना शिवसेनेची मतं वगळता 145 मतं भाजपसह इतरांची मिळाली आहेत. म्हणजेच राज्यात भाजपच्या बाजूने 145 मतं आहेत.

145 मतं भाजपच्या बाजूने असणे याचा सरळ अर्थ असा होतो की, भाजपकडे राज्यात सध्या मॅजिक फिगर तयार आहे. त्यामुळे उद्या शिवसेनेने राज्यातून सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी दिलीच, तर फडणवीसांना काळजी करण्याचं कारण नाही.

विरोधकांच्या मतांचं गणित

दुसरीकडे विरोधकांची मतं फुटल्यानं ते धास्तीत आहेत. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळून 6 मतं फुटलीत, तर इतर 8 विरोधकांनीही भाजपला मतदान केलं आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये नेमकी कुणाची मतं फुटली, याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मीरा कुमार यांना एकूण 77 मतं पडली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार संख्येवर नजर टाकल्यास, या दोन्ही पक्षांचे एकूण 83 आमदार आहेत. म्हणजे ही सगळी मतं मीरा कुमार यांना पडणं अपेक्षित होतं.

दुसरीकडे एमआयएम, भारिप-बहुजन महासंघ, माकप, सपा या पक्षांची एकूण 5 मतं ही मीरा कुमार यांच्याकडे झुकली असण्याची शक्यता अधिक आहे.

आता या पाच पक्षांची मतं मीरा कुमार यांना मिळाली असतील, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकूण 11 मतं फुटली असा त्याचा अर्थ निघतो.

दरम्यान, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले आमदार रमेश कदम यांनी मतदानाच्या दिवशीच जाहीर केलं होतं की, ते रामनाथ कोविंद यांना मतदान करतील.

तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराने रामनाथ कोविंद यांना मत दिलं नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे.

संबंधित बातमी : रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती