मुंबई : नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, मात्र निकालाच्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खलबतं सुरुच होती. 2011 मध्ये भाजपकडे असलेल्या 298 जागा तिप्पट होऊन 893 वर पोहचल्या. हा नक्कीच दोन वर्षांतला फडणवीसांचा करिष्मा मानला जाऊ शकतो. मात्र याच फडणवीसांवर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी बंदूक रोखली होती, असं म्हटलं तर?


147 पैकी 51 नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला, तर 3 हजार 727 पैकी 893 जागा भाजपने पटकावल्या. हा निकाल फडणवीसांसाठी अत्यंत दिलासादायी होता.

सप्टेंबर महिन्यात मराठा मूक मोर्चातून आरक्षणाची मागणी जोर धरु लागली होती. त्यावेळी फडणवीसांनी केलेलं एक विधान अनेकांचं लक्ष वेधून घेत होतं. 'काही लोकांना वाहत्या गंगेत हात धुवायचे आहेत.' हे विधान विरोधकांना उद्देशून नव्हतं, तर स्वकियांसाठी होतं, याचा संदर्भ आता लागत आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लावण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी प्रयत्न सुरु केले होते, असं 'इंडिया टुडे'ने एका वृत्तात म्हटलं आहे. या वृत्ताला भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांनी दुजोरा दिल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. खांदेपालट करण्याबाबत फडणवीसांना कुणकुण लागल्यामुळे त्यांनी थेट मोदींनाच साकडं घातल्याचं म्हटलं जातं.

अमित शाह यांनी आखलेल्या डावपेचाचा हा एक भाग असल्याचं काही वरिष्ठ भाजप नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'इंडिया टुडे'ला सांगितलं आहे. भाजपने शिवसेनेवर अवलंबून राहू नये, यासाठी शाह यांनी खेळी आखल्याचं म्हटलं जातं. इतकंच नाही, तर शाहांनी शिवसेनेच्या 20 आमदारांना भाजपप्रवेशाची ऑफर दिल्याचंही वृत्त आहे.

मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी देवेंद्र फडणवीसांचं चांगलं सूत आहे. त्यामुळे या डावपेचांबाबत फडणवीसांना अंधारात ठेवण्यात आलं होतं. शाहांनी प्रस्ताव ठेवलेल्या एका शिवसेना आमदाराकडून देवेंद्र यांना याची माहिती मिळाली. 123 जागा असलेल्या विधानसभेत भाजप बहुमतापासून फक्त 25 पावलं दूर आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशी दुहेरी भूमिका करणाऱ्या शिवसेनेला त्यांचा हा दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्याचा शाहांचा मानस होता.

अमित शाहांच्या मनात शिवेसनेविषयी चीड आहे. मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंशी असलेले लागेबांधे त्यांना अजिबात रुचत नाहीत, असं एका भाजप नेत्यानं म्हटल्याचं इंडिया टुडेने म्हटलं आहे. ब्राम्हण मुख्यमंत्र्याला हटवून मराठा समाजातील चंद्रकांत पाटलांना हे पद देण्याचा शाहांचा डाव होता, अशी माहिती आहे.

शाह यांची सासुरवाडी कोल्हापुरातील असल्यामुळे कोल्हापूरचे चंद्रकांतदादा हे शाहांच्या जवळचे आहेत. याच कारणामुळे खडसेंनंतर मंत्रिमंडळात विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर अशा ज्येष्ठांना डावलून चंद्रकांत पाटलांना 'नंबर 2' चं स्थान देण्यात आलं. दुसरं म्हणजे शाहांचे अनेक आदेश फडणवीसांनी डावलल्यामुळे त्या रागाची किनारही या वादाला आहेच.

स्थानिक निवडणुकांमध्ये फडणवीसांनी 40 शहरात सभा घेतल्या, त्यापैकी 33 ठिकाणी भाजपला विजय मिळाला. या विजयाचा फायदा फडणवीसांना आपलं स्थान कायम राखण्यात झाला आहे. विशेषतः पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या दोन प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यात त्यांना यश आल्याचं 'इंडिया टुडे'ने म्हटलं आहे.

भाजपने फडणवीसांच्या विदर्भात चांगली कामगिरी केली, तर पंकजांच्या परळीत (बीड) आणि दानवेंच्या भोकरदन (जालना)मध्ये पराभवाची धूळ चाखावी लागली. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना उत्तर महाराष्ट्रात चांगलं काम बजावता आलं. मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं हे यश असल्याचं सांगत फडणवीसांनी 'ब्राऊनी पॉइंट्स'ही मिळवले. शिवसेनेसोबत युतीबाबत निर्णय घेण्याची मोकळीक आपल्याला पक्षाने दिली आहे, असंही फडणवीसांनी जाहीर केलं.

शिवसेनेच्या 'मातोश्री'वर अद्यापही हजेरी न लावलेले अमित शाह हे इतिहासातले भाजपचे एकमेव अध्यक्ष आहेत. यातूनच शाहांच्या मनात सेनेविषयी असलेली कटुता आणि संताप दिसून येतो. दुसरीकडे फडणवीसांनी उद्धव यांचं मन राखण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेशी युती करण्यासाठी फडणवीस मोदींचं मन वळवतील, अशी अटकळ बांधली
जात आहे.

पक्षाच्या पातळीवर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय मात्र भाजपमधील काही जणांना रुचलेले नाहीत. विधानसभा निवडणुकांच्या वेळी इमेज बिल्डिंगसाठी झालेला वारेमाप खर्च काही जणांची नाराजी ओढवून गेला. फडणवीसांना सुरात सूर मिसळणारे कार्यकर्ते आवडतात, एखाद्या निर्णयाची दुसरी बाजू त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला, तर तो विकासविरोधी किंवा सरकारविरोधी ठरतो, असं एका
अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सद्यस्थितीत देवेंद्र फडणवीसांचे तारे लख्खपणे चमकत आहेत, मात्र येत्या काळात अमित शाह काय डावपेच आखतात आणि फडणवीस आपलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.