मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचेकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.
आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे प्रदेशाध्यक्ष होते. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे. एकाच व्यक्तीकडे मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अनुकूल नव्हतं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदावर वर्णी लागताच भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची चर्चा होती.
राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांचे नाव चर्चेत होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. एक ओबीसी चेहरा आणि विदर्भाचा चेहरा यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी संधी मिळाली असल्याची चर्चा आहे. याच बावनकुळेंना या आधी विधानसभेचे तिकीट नाकारले होतं. त्यानंतर आता त्यांना विधानपरिषद आमदारकी मिळाली आणि आता प्रदेशाध्यक्षपद मिळालं.
आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे आगामी निवडणूक लक्षात घेता पुन्हा एकदा त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्याचा विचार करता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भाचे असून त्या पाठोपाठ आता भाजपनेही विदर्भातील चेहऱ्याला संधी दिली आहे. विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजपचे मोठं अस्तित्व असून तुलनेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संघटना तेवढी प्रबळ नाही. त्यामुळे आता विदर्भात भाजप की काँग्रेस बाजी मारतंय हे येत्या काळात समजेल.