Chandrakant Patil: कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालं आहे. विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलेय, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनंही झाली. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत ठाकरे गटाच्या उप नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचं पत्र त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवलं आहे. 


डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.  याच मंत्रालयाच्या मंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हिणकस वक्तव्य करावे हे अत्यंत निंदनीय आहे. समितीच्या सदस्य पदापेक्षा महापुरुषांचा सन्मान माझ्यासाठी लाखपटीने मोलाचा आहे. समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा? हा त्यांच्या सत्सत् विवेकाचा प्रश्न आहे परंतु जिथे आदर्शांचा अवमान होत असेल अशा खात्यांच्या आणि अशा अत्यंत हीन मनोवृत्ती असणाऱ्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य आहे. सबब मी माझ्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.


सुषमा अंधारे यांचं जसच्या तसं पत्र


प्रति,
श्री चंद्रकांत पाटील ,
माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य


विषय -  आपल्या खात्याच्या अखत्यारित येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देण्याबाबत.


महोदय,
 उपरोक्त विषयी समितीच्या समूहावर मी माझे मत विस्तृतपणे नोंदवले आहे व एक पत्र आपले कार्यालयासही पाठवत आहे. तसेच हे पत्र समाज माध्यमावर सर्व चळवळीवर प्रेम करणाऱ्या बांधवांसाठी माहितीस्तव देत आहे.  छत्रपती शिवाजी महाराज,  क्रांतीबा ज्योतिबा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व मंडळी आमच्या जगण्याचे आदर्श आहेत. पण गेली काही महिने सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे. 
  महामहीम राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते ना. मंत्री,  सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे.


समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या सत्सत विवेक प्रश्न आहे मात्र माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती. व सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती.  परंतु ही समिती उच्चतंत्र शिक्षण मंत्रालयाच्याच अखत्यारीत येते आणि जर याच खात्याचे मंत्री यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके हिन दर्जाचे विचार असतील तर समितीतील सदस्य पदापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्यासाठी लाख पटीने महत्त्वाचा आहे. 
सबब आपण केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मी या समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.


_ सुषमा दगडूराव अंधारे