सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संदर्भ घेत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला डिवचलं आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला राष्ट्रवादी पक्ष हा खाऊन टाकणार आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  टोला लगावला आहे. मालेगावमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचे सगळे नगरसेवक महापौर यांच्यासह राष्ट्रवादीत घेतले. संजय राउत यांनी डरकाळी फोडून देखील खेडमध्ये राष्ट्रवादीचा पंचायत समिती सभापती झाला. अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने काँग्रेसचे आणि शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जात आहेत, राष्ट्रवादीच्याच नेत्यांना कशी पदे दिली जातात आणि शिवसेना- काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून कसे डावलले जाते याचा दाखला देत चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.


राष्ट्रवादीत येण्यास अनेक जण इच्छुक आहेत, सांगलीतील देखील काहीजण राष्ट्रवादीत येणार आहेत या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर  बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील हे फूस लावण्यात प्रसिद्ध आहेत आणि याचा प्रत्यय आता शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला  येत आहे असे म्हणत भाजपमधून कुणीह राष्ट्रवादीत जाणार नाहीत असा दावा केला आहे. 


'वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचं काही कारण नाही'


भाजपची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सभापती आणि सदस्यांत अध्यक्ष निवासस्थानी झालेल्या राड्यावर चंद्रकात पाटील यांनी या प्रकरणाची आणि वादाची पक्ष चौकशी करत असल्याचे म्हटलं आहे. पण जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदलाची अनेक सदस्य मागणी करत होते. त्यासाठी हे सदस्य पक्षाच्या वरिष्ठांना देखील भेटले होते. पण पदाधिकारी बदल काही झाला नाही. हा पदाधिकारी बदल निर्णय न झाल्यामुळे असंतोषातून हा वाद, राडा झाला का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचं काही कारण नाही असे म्हणत या विषयावर बोलणं टाळलं.



इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha