BJP Ashish Shelar : राष्ट्रवादीचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आक्रमक होताना दिसत आहे. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी उद्या मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एबीपी माझा सोबत बोलताना दिली.  राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून घोषणाबाजीही करण्यात आली. 


...तर विनापरवानगी मोर्चा काढू


शेलार म्हणाले, नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबईत उद्या भाजपचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या मोर्चाला अद्याप मुंबई पोलीसांकडून परवानगी नाही. मात्र परवानगी न दिल्यास परवानगी शिवाय मोर्चा काढणार असल्याचे शेलार म्हणाले. तसेच मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, मोर्च्यासाठी आम्ही अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीसांची भेट ही झाली आहे. मात्र जो पत्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे शेलार म्हणाले. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे. 


हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा


मलिकांचा राजीनामा घेण्यात येत नाही. हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे, नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा यावर गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. याचा अर्थ न्यायलय सुद्धा सक्षमपणे काम करत आहे., केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप शेलारांनी ठाकरे सरकारवर केला आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपची एकच मागणी आहे नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा. आजही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परंतु सत्ताधारी पक्षांकडून सांगण्यात येत आहे की नवाब मलिकांचा (Nawab Malik) राजीनामा घेतला जाणार नाही. आता मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप अजून आक्रमक होणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha