मुंबई : पालघर जिल्हा परिषद निवडणुकींसाठी भाजप-मनसे युतीनंतर आता मनसे-भाजप युतीच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. पालघर पाठोपाठ पुण्यात मनसे नेत्यांनी भाजपसोबत युती करण्याची मागणी केली तर अशीच मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींसाठी  केली जात आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करायचंच असा चंग भाजपनं बांधला आहे. त्यात भाजपला मनसेची सरळ सरळ साथ मिळते का पडद्यामागून हा महत्वाचा प्रश्न आहे.


राजकारणात काहीही अशक्य नसतं, असं म्हणतात. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, यापैकी कोणाच्याही राजकीय भूमिका एकमेकांशी मेळ खाणाऱ्या नाहीत. तरीही हे सगळे एकत्र आले. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे मनसेचं कार्यक्षेत्र आहे. मराठी माणसावर अन्यायाचा मुद्दा पुढं करून मनसेनं परप्रांतीयांविरोधात राडेही केले आहेत. त्यामुळं मनसेची प्रतिमा परप्रांतीयविरोधी अशी झाली आहे. भाजपसाठी तो चिंतेचा मुद्दा आहे. मात्र, 25 वर्षांपूर्वी शिवसेनेची प्रतिमा नेमकी अशीच होती. तेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून त्यावर तोडगा काढण्यात आला. यावेळीही तोच फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.


 



पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि मनसे एकत्र आले. वाडा तालुक्यातील पंचायत समितीची सापने गणासाठी एक जागा मनसे लढवणार असून मांडा पालसई आणि मोज या तीन जिल्हा परिषदेच्या जागा भाजपकडे देण्यात आल्या आहेत  अजूनही जिल्ह्यातील इतर जागांसाठी मनसे आणि भाजपची बोलणी सुरू असून लवकरच यावर तोडगा निघेल असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आला आहे.


हाच फॉर्म्युला या इतर महानगरपालिकांसाठी ही वापरला जाऊ शकतो. नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे आणि ते स्वत: नाशिक महानगरपालिकेवर लक्ष ठेऊन आहेत. तर पुण्यामध्ये ते स्वत: सगळ पाहत आहेत.  2012 च्या निवडणुकांमध्ये नाशिक इथे मनसेचे 40 नगरसेवक तर पुणे इथे 28 नगरसेवक निवडून आले होते. नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता होती तर नाशिकमध्ये शिवसेना हळूहळू मजबूत होताना देखील दिसत आहे. तर राष्ट्रवादीची ही तिथे मोठी ताकत आहे अशामध्ये भाजपला स्वत:हून इथे सत्ता मिळवणे कठीण दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये मनसेची साथ घेऊन सेना-राष्ट्रवादीचा पराभव केला जाऊ शकतो. 


तसच केडीएमसीमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि गणपत गायकवाड. हे तिन्ही आमदार जर एकत्र आले तर शिवसेनेसाठी मोठं आव्हान कल्याण-डोंबिवली मध्ये उभं राहू शकते असा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. तसच ठाण्यात देखील मगाच्या विधानसभा निवडणूकीत मनसेला बऱ्यापैकी मतदान झाले आहे त्याचा वापर भाजप करु शकते. पण दोन्ही पक्ष एकत्र येतील का पडद्यामागे ही युती होईल हा प्रश्न आहे.