Bird Flu in Maharashtra LIVE Updates | परभणी : मुरुंबा पाठोपाठ असोला गावतही कोंबड्यांचा मृत्यू, दोन शेतकऱ्यांच्या 22 कोंबड्या मृत्युमुखी

Bird Flu in Maharashtra LIVE Updates : कोरोनापाठोपाठ देशासह राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रातील परभणी, बीड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईतही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jan 2021 12:21 PM
परभणी : मुरुंबा पाठोपाठ असोला गावतही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. दोन शेतकऱ्यांच्या 22 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. गावाजवळ अनेक मृत कोंबड्या आढळून आल्या आहेत. मुरुंबा गावापासून 7 किलोमीटर अंतरावर असोला गाव आहे. जिल्ह्यात मुरुंबा, कुपटा, बनवस आणि असोला या 4 गावांत हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
परभणीच्या मुरुंबा गावांमध्ये बर्ड फ्लूने दगावलेल्या कोंबड्यां नंतर उर्वरित राहिलेल्या तब्बल साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुरुंबा गावात तब्बल 80 जणांचे 7 पथक दाखल झाले असुन कोंबड्यांना अनेस्थेसिया दिला जात आहे यानंतर त्यांचे पॅकिंग करून गावाच्या बाहेर करण्यात आलेल्या खड्यांमध्ये त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.

लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथे 400 कोंबड्या अचानकपणे मृत पावल्या होत्या. त्याच पाठोपाठ जिल्ह्यातील सुकणी आणि वंजारवाडी येथेही अश्याच घटना घडल्या होत्या. या मृत कोबड्याचा अहवाल प्राप्त झाला त्यात बर्ड फ्ल्यू झाल्याचं समोर येताचं प्रशासनाने या भागात अलर्ट झोन घोषित केला होता. या भागातून कोणत्याही प्रकारे पक्षी,अंडी किंवा मांस याची वाहतूक बंद केली होती. केंद्रेवाडी येथील ज्या चारशे कोंबड्या मृत झाल्या होत्या त्याच्या बाजूला बायलर कोबड्याचा पोल्ट्री फार्म आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून या ठिकाणच्या 8000 हजार तसेच या भागातील इतर छोटे मोठे कोंबड्या पालन करणारे अनेकांच्या कोंबड्या या प्रशासनाने रात्रीच नष्ट केल्या. ही संख्या 10 हजार पेक्षा अधिक आहे. जिल्ह्यासाठी 10 समिती आणि प्रत्येकी पाच जणांचे 30 पथक तयार करण्यात आले आहे. जे जिल्हाभरातील घटनेवर निगराणी ठेवणार आहे.
कोरोनाकाळात अफवेचा बळी ठरलेला पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे . बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर चिकनची मागणी घटल्याने जिवंत कोंबडीच्या दरात 25 ते 30 रुपयांनी, तर किरकोळ विक्रीच्या दरात 40 ते 50 रुपयांनी घट झाली आहे. अंड्यांचे दरही नगामागे पन्नास पैसे ते एक रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज सत्तर कोटींचे नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महिनाभरात सुमारे दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
परभणी : परभणीच्या मुरुंबा गावातील 1800 पेक्षा जास्त कोंबड्या बर्ड फ्लुने मेल्यानंतर उर्वरित साडेसहा हजार कोंबड्या आज नष्ट केल्या जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी इतर विभागाच्या पथकांसह गावात दाखल झाले असून सात पथकानं मार्फत या कोंबड्यांचं किलिंग म्हणजेच नष्ट केल्या जाणार आहेत. दरम्यान गावही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ग्राम पंचायत निवडणूक असताना गावात शांतता पाहायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी, वंजारवाडी आणि सुकणी या गावात मागील तीन दिवसात अचानकपणे पोल्ट्री फार्म वरील 400 पेक्षा जास्त कोंबड्या दगावल्या होत्या. प्रशासनाने याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. आज अहवाल प्राप्त झाला. ह्या कोबड्याचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यू मुळेच झाला आहे. त्यानंतर प्रशासन कडक पावले उचलत पुढे आले आहे. जिल्ह्याभरासाठी प्रत्येकी पाच जणांचे 30 पथक तयार करण्यात आले आहे. जे जिल्हाभरातील घटनेवर निगराणी ठेवेल. आज संध्याकाळी या भागातील 600 पेक्षा जास्त कोंबड्या योग्य ती खबरदारी घेत नष्ट करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने पोल्ट्री फार्म चालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी काही वेगळे जाणवले तर तात्काळ पशु संवर्धन विभागास माहिती कळावी असे आव्हान केले आहे.
राज्यातील शहरी व ग्रामीण भागात बर्ड फ्ल्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने शहरी व गाव पातळीवर काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला अलर्ट राहण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत झळकवाडी या गावांमध्ये कुठलाही पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी किंवा साधा कर्मचारी देखील फिरकला नाहीये. त्यामुळे या गावात कोंबड्यांची मृत्यू संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्या गावाच्या शेजारी, रोडच्या कडेला फेकून दिल्या जात आहेत. मरण पावलेल्या कोंबड्यांमध्ये अळ्या लागून गावाभोवती दुर्गंधी पसरली आहे. जवळपास या गावातील चारशे कोंबड्याचा मृत्यू झाल्याची माहिती येथील नागरीक व सरपंच दामाजी तांबारे यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यात काही बगळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज अंबरनाथ मध्ये 3 कावळे मृतावस्थेत आढळले. त्यापाठोपाठ कल्याणातही 2 बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील गौरी पाडा तलाव परीसरात मृत बगळे आढळून आले.
उरण तालुक्यातील जासई येथे राहणारे प्रदीप घरत हे गेल्या चार वर्षांपासून कुकुटपालनचा व्यवसाय करत आहेत. यासाठी, ते कोंबड्यांच्या एक महिन्यांच्या पिल्लांपासून नऊ महिन्याच्या कोंबड्यांचे कुकुटपालन करून विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे असलेल्या कोंबड्यांचा अचानक मृत्यू होण्यास सुरुवात झाली. यामुळे गेल्या आठवडाभरात त्यांच्याकडील सुमारे दीडशेपेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच राज्यात पक्षांना 'बर्ड- फ्ल्यू'ची लागण झाल्याची शक्यता असल्याने त्यांनी तात्काळ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
नांदेड : राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना याचे लोन आता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात पसरत असल्याचे चित्र समोर आले आहे. काल चिंचोर्डी येथील नागरिकांच्या कोंबड्या दिवसभर बाहेर चरून घराकडे आलेल्या शेकडो कोंबड्या सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जोडधंदा म्हणून कोंबडी पालन करणाऱ्या पशुपालन करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या कोंबड्या कश्यामुळे मरण पावल्या याची तपासणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम आज चिंचोर्डी गावात दाखल झाली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्या मृत आणि जिवंत कोंबड्याची पाहणी केली आहे. या कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
परभणी : परभणीच्या मुरुंबा गावात बर्ड फ्लूनेच 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावातील 1 किलोमीटरच्या परिसरातील उर्वरित साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. काल दिवसभर पशुवैद्यकीय विभागाने अनेक विभागांच्या परवानग्या मिळवल्या त्यानंतर या नष्ट करण्यासाठी एकूण 7 पथकं तयार करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून पीपीई किट, ग्लोज, मास्क, आदी सर्व साहित्य मिळवून हे सर्व पथक दुपारी मुरुंबा गावात पोचणार आहेत.
लातूर : केंद्रेवाडी पाठोपाठ जिल्ह्यातील सुकणी आणि वंजारवाडी येथेही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. सुकणी येथील शेतकरी शंकर घोणसे यांच्या सात गावरान कोंबड्या आणि वंजारवाडी येथील शेतकरी अशोक मुंढे यांच्या 55 गावरान कोंबड्या अशा एकूण 62 कोंबड्या दगावल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या भागात अलर्ट झोन घोषित केला आहे. मृत कोंबड्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. यासर्व पार्श्वभूमीवर राज्यात अनेक भागांत बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढता असल्याचे दिसून आले आहे. अद्याप लातूर जिल्ह्यात तशी नोंद नाही मात्र प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्याभरात तीस पथकं तयार करण्यात आली आहेत. एका पथकात 05 लोकांचा समावेश करण्यात आला आहे.
सांगली : महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकाही पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला नाही. ज्या पक्ष्यांत बर्ड फ्लू आढळतोय त्यात रानटी पक्षी आणि देशी कोंबड्याचा समावेश आहे. असे असताना मात्र बर्ड फ्लूमुळे मोठा तोटा पोल्ट्री धारकांना सहन करावा लागतोय. पुरेशी खबरदारी, कोंबड्यांना वेळोवेळी इंजेक्शन देण्याचा एकीकडे मोठा खर्च करावा लागत असताना दुसरीकडे अंड्याचे दर घसरल्याने मोठा आर्थिक तोटा पोल्ट्री धारकांना सहन करावा लागतोय. तर पोल्ट्री फॉर्मवर मोठ्या संख्येने अंडी विक्रीविना पडून राहत आहेत. तर अंड्याचे दर देखील 5 रुपयांवरून 3रुपयांवर आले आहेत.
मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या चाचणी अहवालातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर सतर्क होत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये पक्षी कुठंही मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी 1916 या क्रमांकावर संपर्क साधत याबाबतची माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळत आहे.
कोरोनाचं संकट देशातून काढता पाय घेत नाही, तोच देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये परसलेला हा संसर्ग आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवियन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली.

पार्श्वभूमी

Bird Flu in Maharashtra LIVE Updates : कोरोनाचं संकट देशातून काढता पाय घेत नाही, तोच देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये परसलेला हा संसर्ग आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवियन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. ज्यानंतर उत्तराखंडमध्येही याचा फैलाव झाल्याची बाब निदर्शनास आली. सध्याच्या घडीला हे संकट थोपवून लावण्यासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. दरम्यान, अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळं अंडी आणि चिकन खाण्यावर, विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाहीत.


 


देशात कुठवर पसरला आहे बर्ड फ्लू?


 


आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळत आहे.


 


मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन


 


मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या चाचणी अहवालातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर सतर्क होत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये पक्षी कुठंही मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी 1916 या क्रमांकावर संपर्क साधत याबाबतची माहिती देण्याची विचारणाही करण्यात आली आहे.


 


पंतप्रधान मोदी म्हणतात, सावध व्हा!


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पसरणाऱ्या बर्ड फ्लूचा आढावा घेत नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय स्थानिक जलस्त्रोतांच्या आजुबाजूला, प्राणसंग्रहालयात आणि कुक्कुटपालन केंद्रांतील परिस्थितीचा आढाव घेत इथं काटेकोरपणे नजर ठेवण्यावर जोर दिला. वन विभाग, आरोग्य विभाग आणि पशुपालन विभाग यांच्यातील जास्तीत जास्त समन्वय हे संकट थोपवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.