मुंबई : भिवंडीत 2006 साली झालेल्या दोन पोलिसांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला तब्बल 13 वर्षांनी गजाआड करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. मोहमद मोईनुद्दीन मोमीन, असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 13 वर्षांपूर्वी भिवंडीतील कोटरगेट येथील वादग्रस्त जमिनीवर पोलीस स्टेशन बांधकामावरुन दंगल पेटली होती या दंगलीत जमावाकडून दोन पोलिसांची हत्या करण्यात आली होती.

भिवंडी शहरात 5 जुलै 2006 रोजी कोटरगेट येथील निजामपूर पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामास विरोध करण्यात आला होता. त्यानंतर जमावाने दगडफेक करुन दंगल घडवली होती. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त जमावाने दोन पोलिसांची हत्या केली होती. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरातील एका आरोपीच्या पायाला पोलिसांची गोळी लागली असता तो जखमी अवस्थेत पसार झाला होता.

दंगलीत तत्कालीन पोलीस उपायुक्त आर. डी. शिंदे यांच्यासह 39 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी 400 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यातील मोहमद मोईनुद्दीन हा सुध्दा एक आरोपी होता. परंतु तो गोळी लागल्यावर जखमी अवस्थेत पसार झाल्याने त्याचा तपास आज पर्यंत लागला नव्हता.

दरम्यान खबऱ्याकडून मोहमदबद्दल गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी याबाबत तपास करण्याचे निर्देश दिले होते. निजामपूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सापळा रचून मोहमदला भिवंडीतून ताब्यात घेतलं. त्याच्या पायावरील जखमाची खातरजमा केल्यावरच त्याला अटक करण्यात आली. मोहमदला न्यायालयात हजर केले असता त्यावा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.