मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत 'बारामती' जिंकण्याचा निर्धार व्यक्त करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत येणार आहेत. फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीत एकाच मंचावर येणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघावरुन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात एकमेकांवर शाब्दिक फटकारे ओढले आहेत. त्यानंतर, येत्या शुक्रवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला दोघंही बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

केंद्र सरकारची 'वयोश्री योजना' बारामतीत यशस्वीपणे राबवण्याच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

पुण्यात भाजप मेळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी बारामती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही पूर्ण ताकदीने 48 जागांवर निवडणूक लढणार आहोत. मागच्या वेळी 42 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 43 जागा जिंकू आणि ही 43 वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. अमित शाहांनी महाराष्ट्रासाठी भाजपचं 'मिशन 45' मांडलं होतं. या 45 जागांमध्ये बारामतीचाही समावेश असेल, असं अमित शाह म्हणाले होते.

बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. सध्या बारामती मतदार संघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या निर्धारावर टीकास्त्र सोडलं होतं. हे 48 पैकी 45 जागा जिंकू आणि त्यामध्ये बारामतीचा समावेश असेल असे सांगत आहेत. नशीब की अमित शाह यांनी 48 पैकी 50 जागा जिंकणार असं भाकित केलं नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी खिल्लीही उडवली होती.

दुसरीकडे, शरद पवार जर माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उभे राहिले, तर भाजप त्यांचा पराभव करेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला होता. आमची संघटनात्मक रचना अशी आहे, की आम्ही शरद पवारांचा पराभव करु शकू. पण ते बारामतीत उभे राहिले, तर आम्हाला कठीण आहे, असं पाटील म्हणाले होते.
संबंधित बातम्या :

बारामतीचा उमेदवार कोण?, मोदी, शाह की फडणवीस, राष्ट्रवादीचं आव्हान

माझ्या तब्येतीची काळजी करु नका, शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

यावेळी 43 जागा जिंकू आणि 43 वी जागा बारामतीची असेल : देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासाठी अमित शाहांचं मिशन 45, शिवसेनेसोबतच्या युतीचा उल्लेखही नाही