Shiv Sena Dasara Melava 2022 : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी हायकोर्टानं दिलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजीपार्क वापराची परवानगी ठाकरे गटाला मिळाली. याबाबत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्याशी चर्चा केली. हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी भरत गोगावले यांनी दिली. त्याशिवाय आम्ही आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेऊ, ते त्यांचा दसरा मेळावा घेतील, असेही गोगावले म्हणाले. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? हा सामना उद्धव ठाकरे यांनी जिंकला आहे. शिवाजी पार्कसाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. आज यावर हायकोर्टात शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि बीएमसीकडून युक्तिवाद झाला. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 


कोर्टानं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. शिवाजी पार्कसाठी ते कोर्टात गेले होते, आम्हाला कोर्टानं दिलेला निकाल मान्य आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होईल. आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. आमचा कार्यक्रम होईल, त्यांचा ते करतील, अशी प्रतिक्रिया  शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिली. 


शिवाजी पार्कसाठी आम्ही प्रयत्न केला. पण कोर्टाच्या निकालाचा आम्ही आदर करतो. आम्हाला निकाल मान्य आहे. आम्हाला वादविवाद करायचे नाहीत, आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडायचे आहेत. आम्ही मागणी केली होती, आम्हाला परवानगी मिळाली असती तर आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला असता. पण आता आम्ही बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेऊ. बीकेसी मैदानही बाळासाहेब ठाकरे यांच्या घराच्या जवळच आहे,  असे गोगावले म्हणाले.  


एबीपी माझाशी बोलताना भरत गोगावले काय म्हणाले? (Shiv Sena Dasara Melava 2022)



दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कुणाला या प्रश्नावरुन हायकोर्टात मोठं घमासान झालं. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध मुंबई महापालिका असा सामना हायकोर्टात रंगला. कोर्टाने आजच्या अन्य सुनावणी बाजूला ठेवत, दसरा मेळाव्याबाबत सविस्तर सुनावणी घेतली. त्यानंतर तिन्ही बाजूचे दावे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय ठाकरे गटांच्या पारड्यात टाकला. सर्वात आधी हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर हायकोर्टाने महापालिकेलाही झापलं. अखेर हायकोर्टानं उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं निर्णय दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं वृत्त समोर आलेय.


आणखी वाचा :


Shiv Sena Dasara Melava Verdict: ठाकरेंचा पहिला मोठा विजय, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी