Aurangabad News: मुख्यमंत्री एकना शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सिल्लोडमध्ये दाखल होताच त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र काही तासापूर्वीच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतांना पावसाळा संपला असून, पंचनामे देखील पूर्ण झाले आहेत. त्यामुळे शेतात काहीच उरलं नसल्याने आदित्य ठाकरे कशाची पाहणी करणार असे सत्तार म्हणाले होते. पण आता श्रीकांत शिंदे देखील पाहणीसाठी आल्याने अब्दुल सत्तार तोंडघशी पडले आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतांना अब्दुल सत्तार म्हणाले होती की, पावसाळा संपला आहे, सोगणी झाली असून, शेतात आता पिकांचे धसकट उरली आहे. त्यामुळे शेतं खाली झाल्यावर आणि कापसाच्या पिकांचे नकट्या राहिल्यावर आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर येत असतील तर धन्य आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. तर विरोधकांची आता एक कार्यशाळा घेण्याची गरज असून, विरोध कधी करायचा याबाबत तरी त्यांना यातून कळेल असेही सत्तार म्हणाले होते.
अब्दुल सत्तार तोंडघशी...
पावसाळा संपला असून पंचनामे देखील पूर्ण झाले आहेत. तर 24 लाख हेक्टरचे पैसे देण्याची कबुली तत्त्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईचं श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे बांधावर जात असून, प्रत्यक्षात शेतात काहीच उरलं नसल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले होते. मात्र आता खुद्द श्रीकांत शिंदे हे देखील पाहणीसाठी गेले आहे. त्यामुळे शिंदे यांनी कशाची पाहणी केली असा सवाल आता ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे सत्तार स्वतः तोंडघशी पडले आहे.
श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाहणी...
खासदार श्रीकांत शिंदे दुपारी साडेतीन वाजता सिल्लोड येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील घायगाव, अंधारी, फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली. त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद देखील केला. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाचे नेते देखील उपस्थित होते. तर काही वेळात श्रीकांत शिंदे आपल्या सभेतून भाषण करणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.