मुंबई : राज्याचे मंत्री होणार होणार अशी गेल्या दोन वर्षांपासून चर्चा असतानाही शिवसेना आमदार भरत गोगावलेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भरत गोगावलेंना एसटी महामंडळ अध्यक्षपद मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती होती. पण आता ते एसटी महामंडळही गोगावलेंसाठी अद्याप दूर असल्याचं स्पष्ट झालंय.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष होण्यासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले यांना आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाच्या नियमानुसार परिवहन मंत्री हेच महामंडळाचे अध्यक्ष आहेत. सध्या परिवहन विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे एकतर एकनाथ शिंदे यांना परिवहन विभागाचा पदभार सोडावा लागणार किंवा परिवहन विभागाच्या नियमावलीत बदल करावा लागणार अशी माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली.
परिवहन विभागाच्या नियमावलीत बदल केल्यास भरत गोगावले तात्काळ एसटी महामंडळाचे अध्यक्ष होऊ शकतात. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद हे राज्यमंत्री दर्जाचे पद आहे.
महामंडळासाठीही वाट पाहावी लागणार
शिंदे गटातील तीन नेत्यांची नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. पण मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या भरत गोगावलेंचे स्वप्न मात्र अद्याप पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे त्यांना किमान एसटी महामंडळच्या अध्यक्षपदाची संधी दिली जाईल अशी खात्रीलायक माहिती आहे. पण त्यासाठीही आता नियम आडवे येत असल्याने गोगावलेंना काही वेळ वाट पाहावी लागणार असल्याचं दिसतंय.
एसटी महामंडळ घ्यायचं की नाही ते ठरवू
शिंदे गटातील काही नेत्यांची महामंडळावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, आपलीही एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची माहिती आहे. पण ते स्वीकारायचं की नाही त्यावर शिंदे साहेबांशी चर्चा करणार आणि मग निर्णय घेणार.
मंत्रिपदाने हुलकावणी दिली ती दिलीच
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना साथ दिली. शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांचे नाव जवळपास निश्चित होतं. पण काही कारणामुळे त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता आली नव्हती. पुढच्या विस्तारात त्यांना संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता. पण त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवारांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली आणि भरत गोगावलेंना मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली.
ही बातमी वाचा: