नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. केजरीवाल यांनी शनिवारी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केल्यानतंर आज थेट राजामीन्याची घोषणा केली. मी पुढील दोन दिवसांत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं. तसेच, दिल्लीच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुका महाराष्ट्रातील निवडणुकांसोबतच घ्याव्यात, असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आता वेगवान घडामोडी घडत असून अरविंद केजरीवाल यांच्याजागी मुख्यमंत्री कोण होणार?, याचीच चर्चा देशभरात रंगली आहे. मात्र, भाजपकडून केजरीवाल यांच्या राजीनाम्यामागील राजकारण सांगण्यात आलं आहे. तसेच, केजरीवाल यांनी राजीनामा (Resignation) देण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी का मागितला, याचेही कारणही भाजप प्रवक्ते मंजिंदर सिंह सिरसा सांगितलं आहे. 


मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली. पुढील दोन दिवसांमध्ये आपण दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं ते म्हणाले. पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच साधारण 5 ते 6 महिन्यात दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नवी खेळी खेळल्याची चर्चा आहे. त्यावर, आता भाजपनेही प्रतिक्रिया दिली असून दिल्लीत लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने 7 पैकी 7 जागांवर विजय मिळवल्याचंही भाजपने म्हटलं आहे. 


भाजपची पहिली प्रतिक्रिया


सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे अरविंद केजरीवाल यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे केजरीवाल 2 दिवसांचा वेळ मागत आहेत, कारण त्यांना आमदारांना हे पटवून द्यायचं आहे की माझ्या पत्नीला तुम्ही मुख्यमंत्री करा, असं दोन दिवसांच्या वेळ घेण्यामागचं राजकारण असल्याचं भाजप प्रवक्ते मंजिंदर सिंह सिरसा यांनी म्हटलंय. तसेच, तुम्ही जनतेत जाणार असं म्हणता, जनतेने 3 महिने आधीच आपला निर्णय सांगितला आहे. जनतेने तुम्हाला पुन्हा जेलमध्ये पाठवून दिल्लीत लोकसभेच्या 7 पैकी 7 जागा भाजपला जिंकून दिल्या होत्या, असेही राजकीय गणित सिंह यांनी सांगितलं आहे. 


काय म्हणाले केजरीवाल


येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. या काळात आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीत माझ्याऐवजी आपमधील दुसरा कोणत्यातरी नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल. त्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू. जनतेला मी इमानदार वाटत असेल तर त्यांनी मला निवडून द्यावे. मी बेईमान असेल तर जनतेने मला निवडून देऊ नये, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले. 


हेही वाचा


ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन, नंबर झळकणार