Bhandara Rape Case :  मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडली  होती. या घटनेला आज एक महिना लोटला आहे.  गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर घडलेल्या सामूहिक बलात्कार (Bhandara rape case update) प्रकरणातला फरार आरोपी घटनेच्या एक महिन्यानंतरही फरार आहे. 30 जुलै संध्याकाळपासून ते 2 ऑगस्टच्या पहाटेदरम्यान पीडित महिलेवर आधी गोंदिया जिल्ह्यात आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्यात अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळेला बलात्कार झाले होते. भंडारा जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेचे दोन आरोपी घटनेच्या बारा तासानंतरच अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.  मात्र, गोंदिया जिल्ह्यातल्या घटनेचा आरोपी एका महिन्यानंतरही फरार आहे.


राज्याच्या गृह विभागाने या संदर्भात महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. जोवर घटनेचा तपास पूर्ण होत नाही तोवर एसआयटी कार्यरत राहील असे गृह विभागाने जाहीर केले होते. एसआयटी गेले महिनाभरापासून गोंदिया जिल्ह्यात तळ ठोकून आहे. मात्र, आरोपी मिळालेला नाही. 


जंगलाचा भाग असल्यानं आरोपीचा शोध घेण्यात अडचणी


गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली होती तो जंगलाचा भाग आहे. तिथे सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळेही गोंदिया जिल्ह्यातल्या घटनेच्या आरोपीचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.सुरुवातीचे पंधरा दिवस पिडितेची प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे तिचे बयान होत नव्हते. गेल्या आठवड्याभरात पीडितेने बरीचशी माहिती पोलिसांना दिली असून पोलीस त्या माहितीच्या आधारावर शोध घेत असल्याचे संदीप पाटील म्हणाले.


पीडितेच्या माहितीनुसार स्केच बनवले


पीडित महिलेने गोंदिया जिल्ह्यातल्या घटनेसंदर्भातल्या आरोपीची जी माहिती सांगितली होती. त्या आधारे पोलिसांनी एक स्केचही बनवला होता. त्या स्केचशी आणि माहितीशी मिळते जुळते चार लोक ताब्यात घेण्यात आले होते . मात्र त्या चार जणांपैकी कोणाचाही बलात्काराच्या घटनेत सहभाग दिसून नाही.म्हणून त्यांना सोडून देण्यात आल्याचे पाटील म्हणाले.


पीडितेला बोलतं करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत


पीडितेला बोलतं करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची ही मदत घेतली जात आहे. लवकरच आम्ही गोंदिया जिल्ह्यातल्या बलात्काराच्या घटनेच्या फरार आरोपीला अटक करण्यात यश मिळवू असा विश्वास संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.



महत्त्वाच्या बातम्या: