Alibaug Raigad Crime Update: रायगड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर प्रियकरानं प्रेयसीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब देखील उघड झाली आहे. दरम्यान या प्रकरणात प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 


विवाहित महिला गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता


अलिबाग तालुक्यातील नवखार (Alibaug Nakhar) येथे राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहित महिला गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होती. यामुळे, मांडवा पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळच्या सुमारास मुरूड तालुक्यातील गारंबीच्या जंगलालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला झुडपात एका महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला होता. 


या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांच्या मदतीने तपास करण्यात आला. यावेळी या मृतदेहाच्या अंगावर लाकडाचे ओंडके ठेऊन हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. 


तपासादरम्यान अलिबाग तालुक्यातील मांडवा पोलीस ठाण्यात सदर महिला बेपता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून संशयित आरोपी सचिन थळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने पूनम हिची हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांच्या माहितीनुसार  मांडवा येथेच राहणार्‍या सचिनचे त्याच गावातील युवतीशी प्रेमसंबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.आरोपीने मनात राग धरून तिला मुरुडला आणून जीवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी जंगल भागात मयत महिलेच्या अंगावर लाकडे रचून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असं पोलिसांनी सांगितलं. दोघांमध्ये झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सचिन थळे याला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 


या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी  सचिन थळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी जयदिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन गवारे, एएसआय सचिन वाणी, सुरेश वाघमारे, सागर रोहेकर, विलास आंबेतकर, सागर रसाळ यांनी आरोपीला पकडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.


इतर महत्वाच्या बातम्या