नागपूर: भंडारा येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पीडितेला दुसऱ्यांदा अत्याचाराला सामोरं जावं लागल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणात चार आरोपींनी अत्याचार केल्याचं महिलेच्या चौकशीतून समोर आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. 


या चार नराधमांनी पीडितेवर अत्याचार केला,


आरोपी क्र. 1 - श्रीराम ऊरकुंडे - सर्वात आधी या आरोपीने पीडितेला माहेरी सोडतो असं म्हणत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे. पीडितेने या आरोपीच नाव श्रीराम ऊरकुंडे असल्याचं सांगितलंय. पण या नावाची कुठलीच व्यक्ती अस्तित्वात असल्याची माहिती मिळत नसल्याचं खुद्द भंडारा एसपी लोहित मतानी यांनी सांगितलं. पोलिसांनी या नावाच्या व्यक्तीचा तपास घेतला. पण अजून असा कुठलाच व्यक्ती सापडला नाही.


आरोपी क्र.  2 - अमित पारवे- हा तो व्यक्ती आहे ज्याने दुसऱ्या सामूहिक बलात्कारात सहभाग घेतला आणि पीडित महिलेवर अमानवीय अत्याचार करण्यात आला. अमित हा 30 वर्षांचा आहे. तो अविवाहित असून आणि भांडाऱ्याच्या लाखनी येथील रहिवासी आहे. पीडिता ही लाखनी पोलीस स्थानकातून निघाल्यावर धर्मा धाब्यावर पोहचली होती. अमित पारवे जे काम मिळेल ते काम करायचा, कधी मजुरी तर कधी धाब्यावर तर कधी पंक्चर दुकानावर तो काम करायचा. काही दिवस आधी अमित हा धर्मा धाब्यावर कामाला असल्याचं कळतंय आणि त्या दरम्यान त्याची मैत्री धाब्यासमोर असलेल्या आरोपी क्र 03 म्हणजेच पंक्चरच्या दुकानवाल्याशी झाली. त्याच्यावर या आधी कुठल्याही गुन्ह्याची माहिती नाही.


आरोपी क्र. 3 - मोहंम्मद एजाज अन्सारी- धर्मा धाब्यासमोर या व्यक्तीच पंक्चरचे दुकान आहे. अमानवीय अत्याचारात सहभागी होणारा हा 22 वर्षीय तरुण बिहारचा असल्याचं कळतंय. खरं तर हे दुकान जुनं असून हे त्याच्या सासऱ्याचं असल्याची माहिती आहे. जिथं पंक्चरचं दुकान होतं तिथंच तो राहायचा अशी ही माहिती आहे. मोहंम्मद अन्सारीला आपली पूर्ण कहाणी पीडितेने सांगितल्यावर तिथं अमित पारवे आल्याचं कळतंय. त्या पीडित महिलेसमोर अन्सारीने अमितला तिला घरी सोडून ये असं सांगण्याचं नाटक केलं. मात्र अमितने तिला घरी न नेता कान्हाडामोह गावाच्या एका शेतात नेलं आणि तिथं तिच्यावर अमानवीय अत्याचार केला. नंतर त्या ठिकाणी मोहम्मद अन्सारी पोहचला. अत्याचार झालेल्या या महिलेला नंतर या दोघांनी पुलाखाली सोडून दिलं.


आरोपी क्र. 04 - महिलेन दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या बलात्काराच्या घटनेत अजून एक व्यक्ती असल्याचं कळतंय. मात्र या प्रकरणातील पहिलाच आरोपी हा हाती न लागळ्यामुळे आणि त्याची ओळख न पटल्यामुळे आरोपी क्र. 04 बद्दल ही फारस काही सांगता येत नाही.