मुंबई : अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून एक लक्षात आलं की, खरं किती टोचतं. मी केवळ सवाल केला होता की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची बायको काम करत असलेल्या बँकेत पोलिसांची खाती कशाच्या आधारावर वर्ग करण्यात आली? ते जनतेसमोर यावं. याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी जी भाषा वापरली त्यावरून सत्य किती टोचत हे समोर आलं आहे, असं म्हणत भाई जगताप यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बोलताना सांगितलं की, "माझ्या माहितीनुसार 2005 साली आघाडी सरकारने एक निर्णय घेतला होता की, पोलिसांची खाती विविध बँकेत वर्ग करण्यात यावीत. त्यावेळी केवळ निर्णय झाला होता. तो अंमलात आणण्यात आला नव्हता. तो अंमलात आला 2017 साली. विशेष बाब म्हणजे ज्या बँकेत देवेंद्र फडणवीस यांची बायको काम करते त्याच बँकेत कसे काय खाती वर्ग करण्यात आली? असा सवाल माझा आजही कायम आहे. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले. पण ते गौप्यस्फोट काय आहेत हे तरी त्यांनी सांगावं. करावं त्यांनी उघड. मुळात देवेंद्र फडणवीस यांना हा डेटा कुठून मिळाला हा गंभीर प्रश्न आहे. घटनेने ठरवून दिलेले कायदे सर्वांसाठी सारखे आहेत. माझा सवाल केंद्र सरकारला आहे की, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही विशेष अधिकार दिले आहेत का? याचा खुलासा त्यांनी करावा."
राज्यातील घडामोडींमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर बैठका सुरु आहेत, असा सवाल भाई जगताप यांना विचारला असता भाई जगताप म्हणाले की, "आगामी काळात काही राज्यांच्या निवडणुका आहेत. यामध्ये केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. या निवडणुका संदर्भात आढावा घेण्यासाठी सध्या बैठका होत आहेत. याबाबत नुकतेच महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनीदेखील अहवाल दिला आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आम्ही देखील दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. कोविड काळामुळे सध्या राज्यातील सभा, रॅली, मेळावे यांना बंदी घालण्यात आली आहे. अशा कालावधीत ऑनलाइन ज्या काही चर्चा सुरु आहेत. याबाबतचा एक अहवाल देण्यासाठी आम्ही गेलो होतो. अशाच पद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसचे देखील काम सुरु आहे."
दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला होता की, रश्मी शुक्ला यांनी जे फोन टॅप केले होते. त्यामध्ये बदलीसाठी अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेण्यात आले होते. या आरोपाला उत्तर देताना भाई जगताप म्हणाले की, "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, सरकारची अदलाबदल होतं असते. तुमच्या काळात जे अधिकारी होते तेच अधिकारी आता देखील आहेत. तुम्ही देखील काय काय केलं होतं याच्या चर्चा आमच्या कानावर आहेत."
महत्त्वाच्या इतर बातम्या :