Bhagat Singh Koshyari Controversy : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी ट्विट करत कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची आणि याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे म्हटले आहे.
भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करत कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. संभाजीराजे यांनी देखील ट्विट करून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. शिवाय महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
"विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो, अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
'राष्ट्रपती द्रौपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या