Pune Cat Birthday: पुणे तिथे काय उणे हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. पुणेकरांची वाढदिवस साजरा करण्याची पद्धत कायम चर्चेत असते. कधी तलवारीने केक कापत, कधी वृक्षारोपण करुन तर कधी वृद्धाश्रमाला भेट देऊन पुणेकर वाढदिवस साजरा करतात. मात्र यावेळी पुणेकरानं थेट मांजरीचा वाढदिवस साजरा केला आहे. मिली असं या मांजराचं नाव आहे. पुण्यातील खरात कुटुंबीयांनी सोसायटीतील लहान मुलांना बोलावून मांजरीचा वाढदिवस जोमात साजरा केला आहे.
वाढदिवस साजरा करण्यात आलेली मांजर खरात कुटुंबीयांचा महत्वाचा भाग बनली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा जसा वाढदिवस साजरा केला जातो. तसाच वाढदिवस त्यांनी घरातील मांजरीचा करायचा असं ठरवलं. गेल्या 8 वर्षापासून मिली नावाची मांजर खरात कुटुंबात राहते. शेजारच्या लहान मुलांना बोलावून केक कापत मांजरीचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे.
मांजर हा लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेकांच्या आवडीची असते. त्यात पुणेकरांना वेगवेगळ्या जातीच्या मांजरी पाळायचा छंद कायम दिसून येतो. मांजरींच्या करामतीदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त बघितल्या गेलेल्या व्हिडीओंची संख्या बघितली तर त्यात अधिक व्हिडीओ मांजरींचे असतात. त्यामुळे मांजरी कायमच्या सोशल मीडिया सेन्सेशन आहेत.
विद्यापीठात कुत्र्याचा वाढदिवस साजरा
पुणे विद्यापीठात एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या लाडका असलेला 'खंडू' नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात होता.पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी 'खंडू' नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा होता. यासाठी तीन दिवसांपूर्वी फ्लेक्स लावण्यात आला होता. मोठा केक कापून फटाके फोडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यामुळे 'खंडू' नावाच्या कुत्र्याची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली होती.
पुणे विद्यापीठात 'खंडू' नावाचा कुत्रा चांगलाच प्रचलित आहे. याआधी देखील त्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांपासून वाचवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या 'खंडू'वर विशेष प्रेम आहे.पुणे विद्यापीठाचा 'जिगरबाज', 'धाडसी' आणि 'कर्तव्यदक्ष', अशी या खंडूची ओळख आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस सगळ्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा करण्याचं ठरवलं होतं. या वेळी एक फ्लेक्स लावण्यात आला होता आणि त्या फ्लेक्सची चर्चा सगळ्या विद्यापीठात होती. विद्यार्थ्याने असा अनोखा वाढदिवस साजरा केल्यामुळे विद्यापीठात चांगलीच चर्चा रंगली.