मुंबई : ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांपूर्वी (30 डिसेंबर) पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन मंत्र्यांसोबत संवाद साधला. या बैठकीत भाजपपासून सावध राहा अशा सूचना उद्धव ठाकरेंच्या नवीन मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Continues below advertisement


भाजप तुमची आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. हे सरकार अत्यंत संघर्षानंतर बनलं आहे याची जाणीव ठेवा. भाजपने त्यांचे प्रयत्न सुरू केले आहे. खूप काम करा आणि भाजपमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. तुम्हाला माहित आहे की हे सरकार अत्यंत सक्षम आहे. आपण संपूर्ण पाच वर्ष पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती एका मंत्र्यांच्या माध्यमातून समोर येत आहे.


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपले (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना) विचार भिन्न असले तरी आम्ही एक आघाडी आहोत. लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे. त्यामुळे आपण एकत्रितरित्या लोकांचे प्रश्न सोडवणार. आपल्यात मतभिन्नता असली तरी आपण एका परिवारासारखे काम करणार आहोत. आपल्याला राज्याचा विचार करायचा आहे, हे देखील लक्षात ठेवा असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं मंत्र्याने सांगितलं.


दुसरीकडे मंत्र्यांना संबोधित करताना अजित पवार काय म्हणाले हेही या मंत्र्याने सांगितले. भाजपने यापूर्वीच खूप अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपशी निपटण्यासाठी आपण सक्षम आहोत. कहीही काळजी करू नका. तुम्ही मंत्री आहात तर मंत्र्यांसारखे वागा. सरकारी गोष्टींवरुन उगीच आक्रमक होऊ नका, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या.