सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिलपासून देशभरात मतदान सुरु आहे. तीन टप्यात मतदान झाले आहे, तर चार टप्पे शिल्लक आहेत. ज्या ठिकाणी मतदान पार पडले आहे, तिथल्या लोकांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. निकालास (23 मे) जवळपास महिना शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांच्याच राजकीय अंदाजांना धुमारे फुटत आहेत. हे धुमारे केवळ चर्चेपुरते शिल्लक राहिले नसून आता ते पैजेत उतरले आहेत. असाच एक पैजेचा प्रकार सांगलीच्या मिरजेत समोर आला आहे. सांगलीचा खासदार कोण होणार यावरील चर्चेतून दोन मित्रांनी चक्क 1 लाख रुपयांची पैज लावली आहे. या पैजेसाठी त्यांनी थेट नोटरीदेखील केली आहे. त्यामुळे सांगलीत खासदार कोण होणार याचबरोबर एक लाख रुपये कोणाला मिळणार याकडेदेखील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सांगलीत यंदा तिहेरी लढत होत आहे. यावेळी विद्यमान भाजप खासदार संजय पाटील आणि आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यात चुरस आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात उतरलेल्या गोपीचंद पडळकरांचेदेखील या दोन्ही मातब्बरांना मोठे आव्हान असणार आहे.

सांगलीतल्या चहा टपऱ्यांवर, चावडीवर, पारावर आणि जिथे लोक जमतील तिथे सांगलीचा खासदार कोण होणार याचीच चर्चा सुरु आहे. कोण म्हणतं संजय पाटील निवडणूक येणार, कोण म्हणतं विशाल पाटील येणार तर कोण म्हणतं गोपीचंद पडळकर येणार. अशाच एका रंगलेल्या चर्चेदरम्यान स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि भाजपाचे संजय पाटील यांचे कार्यकर्ते असणाऱ्या मिरज तालुक्यातील दोघा मित्रांनी आपलाच नेता विजयी होणार असा दावा ठोकला. त्यानंतर दोघांनी चक्क एक लाख रुपयांची पैज लावली आहे. राजकुमार कोरे आणि रणजित देसाई अशी पैज लावणाऱ्या दोन मित्रांची नावे आहेत. कोरे भाजप कार्यकर्ते आहेत तर देसाई हे काँग्रेस कार्यकर्ते आहेत.

मिरजेच्या मार्केट कमिटीमध्ये कामानिमित्त कोरे आणि देसाई भेटले होते. सांगलीचा खासदार कोण होणार याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर या दोघांनी 1 लाख रुपयांची पैज लावली. इतकंच नव्हे तर उद्या यामध्ये कोणताही बदल होऊ नये, यासाठी दोघांनी चक्क कायदेशीर ग्राह्य मानली जाणारी नोटरी करुन टाकली. तसेच निकालानंतरच्या तारखेचे म्हणजेच 24 मे 2019 या तारखेचे एकमेकांच्या नावाचे चेकही देऊन टाकले आहेत.