एकूण पाच ते सहा जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे चोरटे तामिळनाडूचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी बँकेचे व्यवहार सुरु झाले. त्यानंतर बँकेत आलेल्या चार ते पाच जणांनी, बँकेच्या सगळ्या कॉऊंटरवरील कर्मचाऱ्यांना माहिती विचारण्याच्या निमित्ताने बोलण्यात गुंतवून ठेवलं. नंतर कॅशियरचेही लक्ष विचलित केलं. त्यावेळी काऊंटरच्या आत गेलेल्या एकाने केबिनमधील ड्रॉव्हरमधून बारा लाखाची रोकड उचलली आणि पोबारा केला.
अडीच तासांनंतर बारा लाख रुपये चोरट्यांनी लांबवल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेला भेट देऊन तपास सुरु केला आहे.
या प्रकरणी खडेबाजार पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पाच ते सहा जणांनी बँक कर्मचाऱ्यांचं लक्ष विचलित करुन रक्कम लांबवल्याचे ध्यानात आलं. पोलिसांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली.
बँकेच्या या शाखेचं महिन्यापूर्वीच नुतनीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या महिन्यातच ही घटना घडल्यामुळे, कॅशिअरच्या केबिनमध्ये रक्कम कुठे ठेवली जाते याची चोरट्यांना माहिती असल्याचंही अंदाज व्यक्त केला जात आहे.